शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीआधी - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

ऑक्‍टोबरमध्ये रक्‍कम खात्यात जमा होणार

ऑक्‍टोबरमध्ये रक्‍कम खात्यात जमा होणार
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची रक्कम दिवाळीच्या तोंडावर (ऑक्‍टोबरमध्ये) प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवी. यासाठी बॅंका, सहकार विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाने कर्जमाफीची प्रक्रिया जलदगतीने राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. "सह्याद्री' अतिथीगृहात कर्जमाफीच्या योजनेचा आढावा घेणारी बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, की कर्जमाफी योजनेंतर्गत सध्या 69 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 57 लाख शेतकऱ्यांनी या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. नोंदणीसाठी 15 सप्टेंबर अंतिम मुदत असून बॅंकांनी त्यानंतर आवश्‍यक तो डेटा वेळेवर उपलब्ध करून द्यावा. सहकार, माहिती व तंत्रज्ञान विभागाने त्याची तपासणी करून ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली पाहिजे.

शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यावर त्यांना पुन्हा वित्तीय पतपुरवठ्याच्या कक्षेत आणले पाहिजे जेणे करून नव्याने तो कर्ज घेण्यासाठी पात्र ठरू शकेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी आदींनी मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीमध्ये आपले योगदान दिले. त्यातून जमा झालेल्या रकमेतील 18 कोटी 50 लाख रुपयांचा पहिल्या हप्त्याचा धनादेश सरकारकडे जमा करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन यांना हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

कृषी आघाडीवर...
69 लाख शेतकऱ्यांची नोंदणी
57 लाख शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज
15 सप्टेंबर अंतिम मुदत

Web Title: mumbai maharashtra news farmer loanwaiver before diwali