गडकरींनी देशाचे पंतप्रधान व्हावे - राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 जून 2017

मुंबई - मोदींच्या मंत्रिमंडळात असतानाही आनंदी असणारा, घुसमट न होणारा एकमेव नेता म्हणजे नितीन गडकरी. या मराठी माणसाने एक दिवस देशाच्या सर्वोच्चपदी म्हणजेच पंतप्रधानपदी पोचावे, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुभेच्छा दिल्या. नितीन गडकरींच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी आयोजित समारंभात राऊत यांनी हा नवा सूर लावला. मात्र गडकरी यांनी, "मी समाधानी आहे, मला माझ्या ऐपतीपेक्षाही जास्त मिळाले...' असे नमूद करत हा विषय तेथेच थांबवला.

वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात गडकरी म्हणाले, की मुंबईला आजकाल फारसे येणे होत नाही; पण इथे येण्याची ओढ कायम मनात असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते. मुंबईतल्या ताजेपणामुळे दिल्लीत घुसमटल्यासारखे वाटते. मात्र संजय राऊत यांनी हाच मुद्दा उचलून केंद्रीय मंत्रिमंडळात न घुसमटणारा एकमेव नेता म्हणजे गडकरी, असे सांगून टाकले. आपण दिल्लीत राहा, तेथे सर्वोच्च पदापर्यंत पोचा, अशा शुभेच्छा देत महाराष्ट्र तेवढा एकसंध ठेवा, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. तेव्हा गडकरींनी मला माझ्या ऐपतीपेक्षा खूप काही मिळाले, मी समाधानी आहे, असे स्पष्ट केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सोहळ्याचा मूड लक्षात घेत, आज भ्रष्टाचाराची खूप चर्चा होते; पण जाहीरपणे खाणारा नेता म्हणजे नितीन गडकरी, अशी कोटी केली. जीवनावर, संगीतावर, खाण्यावर मन:पूर्वक प्रेम करणारा नेता..अशा शब्दांत त्यांचा गौरव करत अनेक विकासप्रकल्प त्यांच्या हातून पूर्ण होवोत, अशी अपेक्षा व्यक्‍त केली.

आशाताईंच्या शुभेच्छा
ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले या वेळी हजर होत्या. त्या म्हणाल्या, की गडकरी मला पेडर रोड परिसरातील उड्डाण पुलाच्या कामानिमित्त माहित झाले. आता ते मानससरोवरापर्यंत रस्ता बांधणार आहेत. त्यांच्या सर्व प्रकल्पांना अशीर्वाद. या प्रसंगी त्यांनी दोन ओळीही गुणगुणल्या. या वेळी गडकरींनाही गाण्याचा आग्रह करण्यात आला. मी बाथरूम सिंगर आहे, असे म्हणत त्यांनी "आनेवाला कल बस एक सपना था...' हे गीत गुणगुणले.

Web Title: mumbai maharashtra news Gadkari should be the Prime Minister of the country