उत्सव व जाहिरातबाजी हीच सरकारची कामगिरी - धनंजय मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

मुंबई - 'उत्सव व जाहिरातबाजी हीच राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारची तीन वर्षांतली कामगिरी असून, प्रगतिशील महाराष्ट्र तीन वर्षांत सर्वच क्षेत्रांत पिछाडीवर जात असल्याचे कटू सत्य आहे,'' अशा शब्दांत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे.

मुंबई - 'उत्सव व जाहिरातबाजी हीच राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारची तीन वर्षांतली कामगिरी असून, प्रगतिशील महाराष्ट्र तीन वर्षांत सर्वच क्षेत्रांत पिछाडीवर जात असल्याचे कटू सत्य आहे,'' अशा शब्दांत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे.

ते म्हणाले, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेनेच्या संयुक्त सरकारची तीन वर्षे जनतेसाठी निराशेची, पश्‍चात्ताप करायला लावणारी आहेत. सरकारची असंवेदनशील वृत्ती, चुकलेली धोरणे, फसलेले निर्णय व अक्षम्य अकार्यक्षमतेमुळे राज्याचा विकास खुंटला आहे. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, युवक, महिला, विद्यार्थी असे समाजातले सर्व घटक सरकारवर नाराज आहेत. सरकारविरोधात जनतेतून आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कदाचित यामुळेच तिसऱ्या वर्षपूर्तीचं "सेलिब्रेशन' न करता "कम्युनिकेशन' करण्याचा सावध निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असावा. "मोदी फेस्ट'चं सेलिब्रेशन फसल्यानंतरच हा निर्णय राज्य सरकारसाठी अपरिहार्यच होता.''

'तीन वर्षांत राज्यावरील कर्जाचा बोजा दोन लाख 93 हजार कोटींवरून 4 लाख 44 हजार कोटी म्हणजे दीड लाख कोटींनी वाढला. ही वाढ 50 टक्के आहे. त्या तुलनेत विकास किती झाला, हा प्रश्न आहे. गेल्या तीन वर्षांत नोंद घ्यावी, असे एकही काम काम सरकारने केले नाही. आजवर शेतकरी कर्जमाफीसह जे काही महत्त्वाचे शासन निर्णय सरकारने काढले त्यातला एकही निर्णय परिपूर्ण आणि निर्दोष नव्हता. सरकार शासन निर्णय नीट काढू शकत नाही, त्यावरून राज्य कसे चालवत असतील हे लक्षात येते. सार्वजनिक ठिकाणी "वायफाय' मोफत आहे. पण शौचालय वापरासाठी पैसे मोजा असे सरकारचे धोरण आहे. त्यातही स्वच्छ भारत कर कुठे जातो हा सुद्धा प्रश्न आहे, '' असे मुंडे म्हणाले.

शेतकऱ्यांनाच दोष
शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या तीन वर्षांत 15 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शंभरहून अधिक शेतकरी कीटनाशकांच्या फवारणीमुळे मृत्युमुखी पडले. गेल्या सहा महिन्यात 800 हून अधिक शेतकऱ्यांना कीटकनाशकांची विषबाधा झाली, तरीही सरकारला त्याची दखल घ्यावी वाटली नाही. आता मात्र मुख्यमंत्री शेतकरी कीटकनाशकांची फवारणी चुकीच्या पद्धतीने करतात, असे सांगून त्यांनाच दोष देत आहेत, हे अधिक दुर्दैवी असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: mumbai maharashtra news Government's performance as festive and promotional