खड्डेमुक्‍तीच्या डेडलाइनला गोवा महामार्गाचा ब्रेक

खड्डेमुक्‍तीच्या डेडलाइनला गोवा महामार्गाचा ब्रेक

मुंबई - राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला असतानाच, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्‍तीसाठी 15 डिसेंबर ही चौथी डेडलाइन दिली आहे. मात्र कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाचा इतिहास बघता नवीन डेडलाइनही हुकणार असल्याची शक्‍यता बांधकाम विभागातून व्यक्‍त होत आहे.

राज्यातील खड्डे परिस्थितीमुळे विरोधी पक्षांनी "सेल्फी विथ खड्डे' असे अभिनव आंदोलन सुरू केल्याने राज्य सरकारची धावाधाव सुरू झाली आहे. बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील सातत्याने या परिस्थितीचा आढावा घेत असून, खड्डे बुजविण्याच्या कामासाठी मंत्रालयात वॉर रूम सुरू केली आहे. राज्य सरकारच्या पातळीवर असे उपाय केले जात असले, तरी केंद्राच्या अखत्यारीतील मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आणि या रस्त्यावरील खड्ड्यांचा इतिहास बघता 15 डिसेंबरची डेडलाइन हुकण्याची शक्‍यता आहे. गोवा महामार्गाचे काम केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याची तांत्रिक अडचण आहे. तरीही चंद्रकांत पाटील केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत. पाटील यांनी गोवा रोडला जून व जुलै महिन्यात दोनदा भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी 15 ऑगस्टपूर्वी रस्त्यांवरील खड्डे संपुष्टात येतील असे जाहीर केले होते. त्यानंतर गणेश चतुर्थी व नंतर गणेश विसर्जनाची डेडलाइन दिली. या तिन्ही डेडलाइन संपल्यावर आता 15 डिसेंबरची नवीन तारीख सरकारने जाहीर केली आहे. दरम्यान, पनवेल ते इंदापूर या 84 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण सुप्रिम टोलवेज कंपनीकडून सुरू असून, हे काम मे 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे नियोजन आहे. इंदापूर ते झारापदरम्यानचे चौपदरीकरण रस्ते वाहतूक व महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असून, हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारने 10 हजार 746 कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून, कशेडी घाटातील 13 किलोमीटर बोगद्याच्या परवानगीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविल्याची माहिती बांधकाम विभागातील सूत्रांनी दिली.

दरम्यान, मंत्रालयातील वॉर रूमच्या माध्यमातून बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या रस्त्यांवरील अद्यापही 65 टक्‍के खड्डे आहेत. ते 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अभियंत्याने सांगितले.

खड्डे बुजविण्याची कार्यवाही
रायगड - 1890 किलोमीटरचे रस्ते, 1295 किमीवर खड्डे, 880 किमीवरील खड्डे बुजविले
रत्नागिरी - 2609 किमी रस्ते, 1490 किमीवर खड्डे, 434 किमीवरील खड्डे बुजविले
सिंधुदुर्ग - 1984 किमी रस्ते, 946 किमीवर खड्डे, 291 किमीवरील खड्डे बुजविले.

सरकारी पातळीवरील कार्यवाही
- चंद्रकांत पाटील यांची 24 जुलै रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कंत्राटदार, कोकणातील आमदार-खासदार यांच्या सोबत बैठक
- पनवेल ते इंदापूरदरम्यानचे खड्डे 15 ऑगस्टपर्यंत बुजविण्याचे आदेश. मात्र ही प्रक्रिया अद्याप सुरूच
- इंदापूर ते झारापदरम्यानचे खड्डे याच तारखेपर्यंत बुजविण्याचे आदेश. मात्र कार्यवाही कासवगतीने
- कशेडी ते वाकेड रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम ठेकेदाराकडे वर्ग. खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरूच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com