दहशतवाद रोखण्यास 'निष्ठूर उपाय' हवेत

पीटीआय
शनिवार, 10 जून 2017

मुंबई - 'निष्ठूर उपाय' योजून जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादाचा निःपात करायला हवा, असे परखड मत माजी हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक यांनी व्यक्त केले आहे. दहशतवाद रोखण्यासाठी हवाई दलाची मदत घेणे आणि कोणताही इशारा न देता दहशतवाद्यांना मारण्यासाठी विशेष विभाग तयार करणे, असे उपाय त्यांनी सूचविले आहेत.

मुंबई - 'निष्ठूर उपाय' योजून जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादाचा निःपात करायला हवा, असे परखड मत माजी हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक यांनी व्यक्त केले आहे. दहशतवाद रोखण्यासाठी हवाई दलाची मदत घेणे आणि कोणताही इशारा न देता दहशतवाद्यांना मारण्यासाठी विशेष विभाग तयार करणे, असे उपाय त्यांनी सूचविले आहेत.

'पीटीआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले. जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी तेथे काही काळ राज्यपाल राजवट लागू करून हे उपाय अमलात आणावेत, असे ते म्हणाले. जम्मू-काश्‍मीरमधील स्थिती पाहता, तेथे कठोर उपायांची गरज आहे. त्यासाठी निष्ठूरताच हवी, असे त्यांनी स्पष्ट केले. काश्‍मीर खोरे दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी हवाई दलाच्या ताकदीचा "अधिक कौशल्या'ने वापर करावयास हवा, असे एअर चीफ मार्शल नाईक यांनी स्पष्ट केले. 2009 ते 2011 या काळात ते हवाई दलाचे प्रमुख होते.

त्यांचे हे मत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या मताशी जुळणारे आहे. काश्‍मीर खोऱ्यात लष्कराला "डर्टी वॉर'बरोबर सामना करावा लागत असल्याचे विधान जनरल रावत यांनी नुकतेच व्यक्त केले होते. "हे छुपे युद्ध आहे. असे युद्ध गलिच्छ असते आणि ते त्याच पद्धतीने लढले जाते,' असे जनरल रावत यांनी "पीटीआय'ला गेल्या महिन्यात दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले होते. जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादीविरोधी कारवाईत 2016 पासून आतापर्यंत लष्कराचे 59 अधिकारी आणि जवान हुतात्मा झाले आहेत. या वर्षी आतापर्यंत घुसखोरीचे 22 प्रयत्न उधळून लावण्यात आले असून, सीमारेषेवर 34 घुसखोरांना ठार करण्यात आल्याची अधिकृत आकडेवारी आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी जास्त होत असलेले "रेड झोन' निश्‍चित करावयास हवेत. हे विभाग दहा किलोमीटर परिघाचे असावेत, त्यात हवाई क्षेत्राचाही समावेश असावा आणि या विभागांतील कोणत्याही अनधिकृत हालचाली विघातक ठरवल्या जाव्यात, असे मत एअर चीफ मार्शल नाईक यांनी व्यक्त केले. दहशतवादाचा निःपात करावयाचा असेल, तर अशा विभागांचा विचार करायला हवा, असे ते म्हणाले. परकीय दहशतवाद्यांना शोधून त्यांना संपवण्यासाठी स्पष्ट सूचना असलेली विशेष कृती दलेही तैनात करायला हवीत, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'काश्‍मीर खोऱ्यात सुमारे 250 परकीय दहशतवादी असावेत. त्यांना संपवण्यासाठी विशेष कृती दलांचा वापर करावा. त्यासाठी लष्कराला स्थानिक नागरिकांबरोबर गुप्त माहिती जाळे उभारावे लागेल. राज्यात काही काळ राज्यपाल राजवट लागू केल्यास, हे साध्य करता येईल. निवडणूक घेण्याएवढे वातावरण सुधारेपर्यंत राज्यपाल राजवट ठेवावी.'' दहशतवाद रोखण्यासाठी मानवरहित याने (यूएव्ही) तसेच विमानांचा वापरही करावा, असे मत एअर चीफ मार्शल नाईक यांनी व्यक्त केले.

Web Title: mumbai maharashtra news 'Inadequate Measures' To Prevent Terrorism