कर्जमाफीच्या याद्यांमधील फोलपणा उघड - नवले

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 जुलै 2017

मुंबई - सरकारच्या संभाव्य शेतकरी कर्जमाफी लाभार्थी याद्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या होणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील एकही संभाव्य लाभार्थी असू नये, ही बाब या याद्यांमधील फोलपणाच उघड करणारी असल्याचा आरोप सुकाणू समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी केला आहे.

नगर व नाशिक जिल्हा बॅंकेची वसुली उत्तम असतानाही येथे लाखो शेतकरी थकीत दाखविण्यात आले आहेत. कर्जमाफीच्या शर्ती व अटींमुळे प्रत्यक्षात या जिल्ह्यातील गावांमध्ये बोटांवर मोजता येतील इतकेच शेतकरी प्रत्यक्षात कर्जमाफीसाठी पात्र होतील अशी परिस्थिती आहे. पालघरसारख्या जिल्ह्यात केवळ 918 शेतकरीच संकटग्रस्त असल्याचे याद्यांमध्ये दाखविण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या याद्यांचा हवाला देऊन 40 लाख उतारे कोरे होणार असल्याचे जाहीर केले, त्या याद्या जर इतक्‍या फसव्या असतील, तर मुख्यमंत्र्यांची घोषणाही स्वाभाविकपणे तितकीच फसवी असणार हे उघड असल्याची टीकाही डॉ. नवले यांनी केली आहे.

कर्जमाफीच्या याद्यांमध्ये मुंबई शहरात 694 शेतकरी व मुंबई उपनगरात 119 शेतकरी पात्र असल्याचे दाखविण्यात आले आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये पीककर्ज घेतलेले व शेती करणारे शेतकरी आहेत व ते संकटग्रस्त आहेत, असा अर्थ या याद्या पाहता निघतो आहे. वस्तुस्थितीची ही क्रूर चेष्टा असल्याची टीका सुकाणू समितीने केली आहे.

Web Title: mumbai maharashtra news loanwaiver list open the scales