मंत्रालयातील विभागांचा तीन तिघाडा, काम बिघाडा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

मुंबई - कर्जमाफीच्या अंमलबजावणीच्या संगणकीय यादीत उडालेल्या गोंधळाने मंत्रालयातील संबधित विभागांची त्रेधातिरपीट सुरू आहे. सहकार, वित्त व माहिती तंत्रज्ञान या तीन विभागांतील अधिकाऱ्यांचा "तीन तिघाडा, काम बिघाडा' अशी अवस्था झाली आहे.

मुंबई - कर्जमाफीच्या अंमलबजावणीच्या संगणकीय यादीत उडालेल्या गोंधळाने मंत्रालयातील संबधित विभागांची त्रेधातिरपीट सुरू आहे. सहकार, वित्त व माहिती तंत्रज्ञान या तीन विभागांतील अधिकाऱ्यांचा "तीन तिघाडा, काम बिघाडा' अशी अवस्था झाली आहे.

ऐन दिवाळीत पारदर्शक कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सरकारने बळिराजाची दिवाळी आनंदात असल्याची जाहिरात केली. मात्र प्रत्यक्ष कर्जमाफीची अंमलबजावणी करताना पुढे येत असलेल्या अक्षम्य त्रुटी पाहता एकाही पात्र शेतकऱ्यांच्या सातबारावरील कर्जाचा बोजा अद्याप कमी झालेला नाही. पहिल्या यादीतील 8 लाख 40 हजार शेतकऱ्यांपैकी शेकडो शेतकरी कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही वंचित आहेत. तर ज्यांना प्रमाणपत्र मिळाले, त्या शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीसाठी पात्रतेच्या यादीतच नाहीत. यावरून सरकारी यंत्रणेचा पुरता फज्जा उडालेला असताना माहिती व तंत्रज्ञान विभागावर खापर फोडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच सहकार व माहिती तंत्रज्ञान विभागातल्या अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी सुरू झाली आहे.

दरम्यान, वित्त विभागाने पात्र शेतकऱ्यांच्या नावे कर्जाची रक्कम वितरीत करण्यासाठीचा तगादा लावला असला तरी पात्रतेची यादीच सहकार विभागाकडे निश्‍चीत नसल्याने मोठी अडचण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोवीस तासांत पात्र व अपात्र शेतकऱ्यांचा घोळ मिटविण्याचे आदेश दिलेले असले, तरी तूर्तास तरी यामध्ये सुधारणा करताना माहिती व तंत्रज्ञान विभागाला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

त्यातच कर्जमाफीची रक्कम संबधित बॅंकानी स्वनिधीतून द्यावी, असा नवीनच आदेश सरकारचा असल्याने स्थानिक व राष्ट्रीयीकृत बॅंकांची कोंडी झाली आहे. सरकारने कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले असले, तरी बॅंकाकडे जोपर्यंत कर्जाची रक्कम जमा होत नाही तोपर्यंत संबंधित शेतकऱ्याच्या सातबारावरील कर्जाचा बोजा कमी करता येणार नाही, असे स्पष्टपणे बॅंकाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे बॅंका व शेतकरी यांच्यात अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग सुरू आहेत.

कर्जमाफीच्या अंमलबजावणीतल्या या गोंधळामुळे मंत्रालतील अधिकारीदेखील हतबल झाले असून, शेतकऱ्यांची ही घोर फसवणूक असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी सुरू केला आहे. या परिस्थितीत सरकार कर्जमाफीचे श्रेय घेणाऱ्या जाहिराती करत असताना एकाही शेतकऱ्याला अद्याप लाभ मिळत नसल्याने हे जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रयत्न असल्याचा संताप वाढीस लागला आहे.

Web Title: mumbai maharashtra news mantralay department