तिहेरी तलाकविरोधात मुस्लिम समाज आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

मुंबई - लोकसभेत बहुमताने मंजूर झालेले द मुस्लिम वूमन (प्रोटेक्‍शन ऑफ राईट ऑन मॅरेज) म्हणजेच तिहेरी तलाक विधेयकाला मुस्लिम महिलांनी विरोध केला आहे. अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने उद्या शनिवारी (ता. 31) दुपारी 2 ते 4 या वेळेत या विधेयकाच्या विरोधात आझाद मैदानात निदर्शने केली जातील, अशी माहिती ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या मुंबई विभागाच्या महिला अध्यक्ष डॉ. असमा झायरा यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.

तिहेरी तलाक विधेयक घाईगडबडीत लोकसभेत मंजूर केल्याचा आरोप करत हे विधेयक मागे घ्यावे, अशी मागणीही डॉ. झायरा यांनी केली. केंद्र सरकारने मुस्लिम समाजासाठीचा तिहेरी तलाकबाबतचा कायदा समाजातील धर्मगुरूंना विश्‍वासात न घेता तयार केल्याचा आरोप ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या महिलांनी केला आहे.

"त्या' समाजप्रतिनिधी नाहीत!
या कायद्याचे समर्थन ज्या महिलांनी केले आहे, त्या मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधी नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच हे विधेयक म्हणजे महिला आणि त्यांच्या मुलांच्या अधिकारांच्या विरोधात आहे. त्यामुळे कुटुंबसंस्था उद्‌ध्वस्त होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. आम्ही या बिलाच्या विरोधात पाच कोटी सह्या घेतल्या होत्या. त्यातील दोन कोटी सह्या या महिलांच्या होत्या. हे सर्व आम्ही कायदा आयोगाला सादर केले असल्याचेही त्यांनी सांगितले. 90 टक्के मुस्लिम महिला मुस्लिम पर्सनल लॉचे समर्थन करीत असल्याचे डॉ. झायरा यांनी स्पष्ट केले. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्या म्हणाल्या.

Web Title: mumbai maharashtra news muslim society talaq oppose agitation