सत्ता गेली म्हणून घरी बसून चालणार नाही - नारायण राणे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मुंबई - 'सत्ता गेली तरी घरी बसून चालणार नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आदर्श घ्यायला हवा,'' अशा शब्दांत नारायण राणे यांनी कॉंग्रेस नेत्यांना विधान परिषदेत सुनावले.

मुंबई - 'सत्ता गेली तरी घरी बसून चालणार नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आदर्श घ्यायला हवा,'' अशा शब्दांत नारायण राणे यांनी कॉंग्रेस नेत्यांना विधान परिषदेत सुनावले.

इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या गौरव कार्याच्या प्रस्तावावर बोलताना राणे यांनी इंदिरा गांधी यांचे खंबीर नेतृत्व देश कधीही विसरू शकणार नाही, असे त्यांनी नमूद केले. '1977 मध्ये कॉंग्रेसचा पराभव झाला, त्या वेळी नागपूर येथे पत्रकारांनी प्रश्न विचारला, की कॉंग्रेस एवढा मोठा पक्ष असताना पराभव कसा झाला? यावर इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, की हार झाली म्हणून काय झाले? पुन्हा जिंकणार आहे. घरी बसून राहणार नाही. इंदिराजी यांनी त्या काळी दिलेले उत्तर आताच्या कॉंग्रेस नेत्यांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे,'' असा घरचा आहेर राणे यांनी सध्या सत्तेत नसलेल्या कॉंग्रेसजनांना दिला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 320 व्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी रायगडावर आल्या होत्या त्या वेळी योगायोगाने तेथे त्यांना जवळून पाहण्याचा योग आला होता. त्या वेळी महाराजांसमोर उभे राहून इंदिरा गांधी यांनी सॅल्युट मारला, ते पाहून त्यांच्या करारी व्यक्तिमत्त्वाची झलक पाहायला मिळाली होती, अशी आठवण राणे यांनी सांगितली. देशातील कोणताही महान नेता हा त्याच्या कार्यकर्तृत्वामुळे पक्षाच्या आणि धर्माच्या पलीकडचा असतो; पण इंदिरा गांधी यांच्या गौरव प्रस्तावावर सत्ताधारी पक्षासह सभागृहात उपस्थिती का नाही, असा सवाल नारायण राणे यांनी या वेळी केला. कृतज्ञता व्यक्त होत असताना सभागृहात उपस्थित राहणे हेसुद्धा एक प्रकारे देशप्रेम असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

जागतिक स्तरावर कायदे बदल, विकास, पर्यावरण अशा विषयांवर इंदिरा गांधी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून पुढाकार घेतला होता, अशी माहिती शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

अलाहाबादच्या तुरुंगात त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी नऊ महिने कारावास भोगला होता. त्या गरीब महिलांच्या कैवारी होत्या. बॅंकांचे राष्ट्रीयीकरण, 20 कलमी कार्यक्रम असे महत्त्वाचे कार्यक्रम त्यांनी राबविले. भारतातील सर्व महिलांच्या राजकारणातील त्या प्रेरणास्थान बनल्याचे गोऱ्हे यांनी नमूद केले.

इंदिरा गांधी व शिवसेनेच्या संबंधांबद्दल बोलताना गोऱ्हे म्हणाल्या, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व कॉंग्रेसमध्ये विचारांचे मतभेद असले तरी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या व्यंग्यचित्रांतून अनेक भाव व्यक्त केले आहेत. त्यांनी रेखाटलेले एक चित्र 1979 मधील आहे. इंदिरा गांधी त्या वेळी उत्तर भारतातील रायबरेली व दक्षिण भारतातील मेडक मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. "दि ग्रेट रॉंयल सर्कस' असे नाव या चित्राला देऊन दोन अश्वांना त्या सांभाळत आहेत, असे वर्णन केले आहे. 1984 मध्ये इंदिरा गांधी यांचा धक्कादायक निधन झाले. त्यानंतर विझलेला दीप व त्याच्या काजळी व धूरातून इंदिराजींचे चित्र साकारून बाळासाहेब ठाकरे यांनी लिहिले होते, "शब्दांची गरज नाही, देश अंधारला, इंदिराजी गेल्या'.

गांधी घराण्याची बदनामी थांबवावी
गांधी घराण्याची सोशल मीडियावरून बदनामी होत आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावे व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंनद ठाकूर यांनी केली. गांधी घराण्याला देशाची सेवा करण्याचे भाग्य लाभले. या घराण्याने देशाच्या हितासाठी 16 वेळा तुरुंगवास भोगला आहे. आजही अनेकांना गांधी घराण्याचा इतिहास माहीत नाही, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर बदनामी करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावरून प्रसिद्ध केल्या जात आहेत. अशा बदनामी करणाऱ्या पोस्ट तत्काळ थांबवाव्यात. सरकारने त्यात लक्ष घालावे आणि संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ठाकूर यांनी गौरव प्रस्तावावर बोलताना केली. त्यानंतर इंदिरा गांधी यांना विधान परिषदेत आदरांजली वाहिली.

Web Title: mumbai maharashtra news narayan rane talking