कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव - नारायण राणे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 जानेवारी 2018

मुंबई - 'कोकणात नाणार येथील पेट्रोकेमिकल प्रकल्प आणून कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असून, शिवसेनेची कोकणबाबतची भूमिका कायमच दुटप्पी राहिली आहे,' असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांनी आज केला. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही. त्यासाठी कोकणचा स्वाभिमान म्हणून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष तीव्र विरोध करणार असल्याचा इशाराही राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

नाणार प्रकल्पामुळे 22,430 हेक्‍टरवरील लागवडीखालील क्षेत्र नष्ट होणार आहे. यामध्ये आंबा, काजू, नारळ व सुपारीच्या बागा आहेत.

शिवाय भातशेती आहे. तब्बल 16,000 हेक्‍टर इतक्‍या क्षेत्रावर हा प्रकल्प असल्याने हे संपूर्ण क्षेत्र नष्ट होणार असल्याचे राणे म्हणाले. हा पेट्रोकेमिकल प्रकल्प कोकणात यावा यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई व केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी प्रयत्न केले आहेत. यासाठी मोठी आर्थिक उलाढाल देखील झाल्याचा संशय असल्याचे राणे यांनी सांगितले. या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा कठोर विरोध आहे. मात्र, शिवसेना पोलिसांच्या माध्यमातून नागरिकांवर दबाव आणत आहे. प्रकल्पविरोधी एका स्थानिक कार्यकर्त्याला "मातोश्री'वर बोलावून धमकवण्यात आल्याचा दावाही राणे यांनी केला. या सर्व प्रकाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

Web Title: mumbai maharashtra news narayan rane talking on shivsena