मोबाईलचे "व्यसन' सोडविण्यासाठी हवी सकारात्मकता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला - दुरावणारी नाती अन्‌ घटलेल्या संवादाचे दुष्परिणाम

मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला - दुरावणारी नाती अन्‌ घटलेल्या संवादाचे दुष्परिणाम
मुंबई - मोबाईलच्या सापळ्यात नवी पिढी पूर्ण अडकल्याची ओरड पालकांकडून नेहमीच होत असली तरी प्रत्यक्षात त्याला तेही कारणीभूत असतात हे मात्र ते लक्षातच घेत नाहीत. या गोष्टीला दुरावणारी नाती आणि नसलेला संवाद बऱ्याच अंशी जबाबदार ठरू शकतो. त्यामुळेच पालकांची सकारात्मक भूमिकाच मुलांना मोबाईलच्या व्यसनातून बाहेर काढू शकते, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ देत आहेत.

"आमची मुलं आमच्याशी मान वर करून बोलत नाही हो,' हे एकेकाळी आपला धाक किती आहे हे दाखवण्यासाठी पालक सांगत असत. आजही ते सांगितले जाते, पण एक तक्रार म्हणून. मोबाईलवरची नजर आपल्या पालकांशी बोलतानाही न हटवणाऱ्या अशा मुलांचे हैराण झालेले आई-बाबा आता मानसोपचार तज्ज्ञांना भेटू लागले आहेत. हे मोबाईल व्यसन सुटावे म्हणून त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यास सुरवात केली आहे; मात्र पालकांचा आपल्या मुलांबद्दलच्या तक्रारींचा पाढा संपल्यानंतर मानसोपचार तज्ज्ञांनी विचारलेल्या प्रश्‍नावर पालकांकडे उत्तरच नसते. त्यातून समोर येते ते त्यांचा आपल्या मुलांशी संवादच नसल्याचे वास्तव...

हरवलेल्या संवादातून मुलांनी मोबाईलचा आधार घेतल्याचे मुंबई विद्यापीठाच्या उपयोजित मानसशास्त्र विभाग आणि समुपदेशन केंद्रप्रमुख डॉ. गौतम गवळी सांगतात. डॉ. गवळी म्हणाले, ""पालकांच्या आपल्या पाल्याविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या आपल्या पालकांविरोधात असंख्य तक्रारी आमच्याकडे येतात. मुलांचे आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही, यामुळे चिडलेल्या एका पालकाने त्याचा चक्क मोबाईलच फोडून टाकला. कित्येक विद्यार्थी तुटलेल्या काचेचा मोबाईल दाखवत आपल्या पालकांविरोधातल्या तक्रारी, दुःख मांडतात. अशा वेळी पालकांनी लक्षात घ्यायला हवे, की ओरखडे केवळ मोबाईलच्या काचेवर नाही, मुलांच्या मनावरही येत असतात. आज पालकांना त्यांच्या कार्यालयातून मोठा ताण सहन करावा लागत असतो. त्याचा परिणाम घरातही जाणवतो. अनेकदा मुलांना मोबाईल वापरू नको, असे सांगणाऱ्या पालकांची नजर हातातल्या मोबाईलमधून हटत नाही त्याचे काय करणार?''

"रात्री जेवताना जेवणाच्या टेबलवर एकत्र येणारे कुटुंब हे उत्तमच, पण तिथेही आईवडील दिवसभरातील मुलांच्या चुकीचा पाढा वाचत असतील तर ते चुकीचेच. जेवणाच्या वेळी संपूर्ण परिवार एकत्र असताना हलक्‍या फुलक्‍या गप्पा व्हायला हव्यात. तसे नाही झाले तर संवादच खुंटतो. कित्येकदा तर पालकांशी बोलणे टाळण्यासाठीच मुले मोबाईलचा आधार घेतात. अशा वेळी संवाद वाढवायला हवा'', असा सल्लाही डॉ. गवळी देतात. त्याचबरोबर ते सांगतात, "मोबाईलमुळे संवाद खुंटला असेल तर किमान त्याच्या मदतीनेच संवादाची पुन्हा सुरवात करता येतेय का ते पाहा. तो संवाद एकदा सुरू झाला की प्रत्यक्ष संवाद वाढवा. मुलांना मोबाईलवेड एका दिवसात लागत नाही, त्यामुळे ते एका दिवसातच सुटणार नाही. त्यासाठी संवाद आवश्‍यक आहेच, पण त्याचबरोबर हवी असते सहनशीलताही!'

मोबाईचे व्यसन सोडवण्यासाठी...
- घरात पालक-मुलांत संवाद वाढावा, मुलांशी मित्रत्वाचे नाते असावे.
- मुले करिअरबाबत "फोकस' असल्यास पालकांनी फार काळजी करायची गरज नाही.
- मोबाईल, संगणक वापराच्या दुरुपयोगाबाबतचे मुद्दे मित्रत्वाच्या नात्यानेच समजून सांगावे.
- आधी केले मग सांगितले, हे पालकांनी आपल्या मोबाईल वापराबद्दलही लक्षात ठेवावे.

Web Title: mumbai maharashtra news the need for mobile to addiction release