गुरुपौर्णिमेला 'मातोश्री'कडे नेत्यांची पाठ

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 जुलै 2017

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांमध्ये गुरू-शिष्याचे नाते होते. त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त "मातोश्री'वर दरवर्षी मोठी गर्दी होते. आज मात्र "मातोश्री'वर होणारी ही गर्दी या वर्षी ओसरलेली पाहायला मिळाली.

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांमध्ये गुरू-शिष्याचे नाते होते. त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त "मातोश्री'वर दरवर्षी मोठी गर्दी होते. आज मात्र "मातोश्री'वर होणारी ही गर्दी या वर्षी ओसरलेली पाहायला मिळाली.

शिवसेनेची स्थापना झाल्यापासून प्रत्येक वर्षी दसरा मेळावा, शिवसेनेचा स्थापना दिन, "मार्मिक'चा वर्धापन दिन असे कार्यक्रम आजपर्यंत राबविण्याची शिवसेनेत परंपरा आहे. त्याच्या जोडीला गुरुपौर्णिमेचे महत्त्वही कायम ठेवण्यात आले आहे. गुरुपौर्णिमेला "मातोश्री'च्या बाहेर एक पेटी ठेवली जायची, जी आजही ठेवली जाते. त्या पेटीत गुरुदक्षिणा म्हणून शिवसैनिक पैसे टाकत असत आणि ते पैसे पक्षाचा निधी म्हणून वापरत असत. गुरुपौर्णिमेनिम्मित राज्यभरातले कार्यकर्ते "मातोश्री'वर येतात. या दिवशी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी "मातोश्री'वर गर्दी करत असतात.

"मातोश्री'च्या गॅलरीत येऊन उपस्थित जनसमुदाला बाळासाहेब आशीर्वाद देत असत. त्यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. आज मात्र परंपरेला खंड पडला की काय, असे चित्र निर्माण झाले. या वेळी ती गर्दी दिसली नाही.

आज शिवसैनिकांची तुरळक गर्दी "मातोश्री'वर दिसून आली. मंत्री, खासदार, आमदार आणि नगरसेवक "मातोश्री'ला विसरलेत का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कारण आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह मुंबईचे नगरसेवक, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि संपर्कप्रमुखही "मातोश्री'कडे फिरकले नाहीत. राज्यात आणि केंद्रात शिवसेना सत्तेत सामील असल्याने आजच्या दिवशी पदाधिकाऱ्यांची गर्दी ओसंडून पाहायला मिळेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र, नेत्यांमध्येच मरगळ आल्याचे आजचे चित्र होते.

Web Title: mumbai maharashtra news no response leaders to matoshree at gurupournima