प्रस्ताव मांडू देण्यास विरोधकांचा नकार

मृणालिनी नानिवडेकर
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबई - मराठा मूक मोर्च्याच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या अडिच वर्षात सरकारने केलेल्या पाठपुराव्याचा प्रस्ताव मांडण्याचा सत्ताधारी आघाडीने केलेला प्रयत्न आज विरोधकांनी हाणून पाडला. मराठा मोर्च्याच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतरच सभागृहात यासंदर्भात निवेदन करावे, अशी भूमिका विरोधी पक्षाने घेतली आहे, तर सत्ताधारी आघाडीने मराठा समाजाचा प्रश्‍न हाती घेवून विरोधक राजकारण करत असल्याचा ठपका राज्यकर्त्यांनी ठेवला आहे. आज दिवसभर यासंदर्भात विधीमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठका सुरू होत्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मराठा मूक मोर्च्यात विरोधकांनी सर्व ताकदीनिशी प्रवेश केला असल्याचे सत्ताधाऱ्यांना वाटते. त्यामुळे तीन दिवसांच्या रजेनंतर काल रात्री तयार करण्यात आलेल्या कामकाजपत्रिकेत पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रस्तावाऐवजी मराठा समाजासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती देणारा ठराव टाकण्यात आला. मराठा मोर्च्याच्या मागण्या सरकारने आधीच कशा मान्य केल्या आहेत, हे दाखवणारा प्रस्ताव असलेली कार्यक्रम पत्रिका उशीरा वितरीत करण्यात आली आणि आधीची कार्यक्रम पत्रिका मागे घेण्यात आली.

या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकार मराठा मोर्च्यापूर्वीच त्यांच्या मागण्यांतील हवा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप विरोधकांनी सुरू केले. विधीमंडळाच्या दालनात अध्यक्षांनी घेतलेल्या बैठकीतही या ठरावाला विरोधी पक्षांनी विरोध केला. तर विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांचे बहुमत नसल्याने विरोधी पक्षाने सुरू केलेल्या दबावासमोर ते हतबल झाले होते.

इंदिरा गांधींचा अभिनंदन प्रस्ताव झाकोळणार
दरम्यान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे अभिनंदन करण्यासाठी ठराव मांडण्यात आला आहे. त्यावर "ऑगस्ट क्रांती दिना'चे निमित्त साधून उद्या (ता. 9) चर्चा होणार होती. ही चर्चा सकाळी सुरू करा, अशी कॉंग्रेसची मागणी आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोर्चा आटोपल्यावर ही चर्चा सुरू करावी, असा पवित्रा घेतला आहे.

Web Title: mumbai maharashtra news Opponents refuse to offer the proposal