राज्यपालांच्या हस्ते पोलिस पदके प्रदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मुंबई - पोलिस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेल्या पोलिस पदकांचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते मंगळवारी (ता.16) वितरण झाले. यात एक राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक, 12 पोलिस शौर्यपदके, उल्लेखनीय सेवेबद्दल 7 राष्ट्रपती पोलिस पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल 80 पोलिस पदकांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन 2015 रोजी राष्ट्रपतींनी या पदकांची घोषणा केली होती.

पोलिस हवालदार गणपत नेवरू मडावी यांना राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक; तर पोलिस शिपाई सुनील तुकडू मडावी आणि पोलिस नाईक गिरिधर नागो आत्राम यांना पोलिस शौर्यपदक मरणोत्तर देण्यात आले.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मोहंमद सुवेज महबूब हक आणि यशवंत काळे (पोलिस उपअधीक्षक, सातारा) यांच्यासह 12 अधिकाऱ्यांना पोलिस शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले.

उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक विजेत्यांमध्ये कृष्णलाल बिश्नोई (सेवानिवृत्त महासंचालक- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ), संजय बर्वे (महासंचालक- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ), विवेक फणसाळकर (अपर पोलिस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) यांच्यासह सात जणांचा; तर पोलिस पदक विजेत्यांमध्ये डॉ. सुरेश मेकला (विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल, पुणे), सुहास वारके (पोलिस उपमहानिरीक्षक, दहशतवादविरोधी पथक, महाराष्ट्र राज्य), डॉ. जय जाधव (पोलिस उपमहानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे) यांच्यासह 80 जणांचा समावेश आहे.

समारंभाला गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलिस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, पुरस्कारप्राप्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Web Title: mumbai maharashtra news police award distribute by governor