पोलिसांना मिळणार 'बॉडी वॉर्म कॅमेरे'

मंगेश सौंदाळकर
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - कर्तव्यावरील पोलिसांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी आता "बॉडी वॉर्म कॅमेरे' दिले जाणार आहेत. मुंबईसह राज्यातील पोलिसांना हे कॅमेरे देण्यासाठी गृह विभागाने निविदा मागवल्या आहेत.

मुंबई - कर्तव्यावरील पोलिसांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी आता "बॉडी वॉर्म कॅमेरे' दिले जाणार आहेत. मुंबईसह राज्यातील पोलिसांना हे कॅमेरे देण्यासाठी गृह विभागाने निविदा मागवल्या आहेत.

प्रशासनाचा कणा असलेल्या पोलिसांवर कर्तव्यादरम्यान किंवा अनुचित घटनेच्या वेळी हल्ले होतात. खास करून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून हे हल्ले होतात. काही महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिस विलास शिंदे यांच्यावर हल्ला झाला होता. त्यात जखमी होऊन उपचारादरम्यान शिंदे यांचा मृत्यू झाला होता. गृह विभागाच्या वरिष्ठ पातळीवर बैठका झाल्या आणि त्यानंतर हे कॅमेरे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रायोगिक तत्त्वावर एका कंपनीने मुंबई वाहतूक पोलिसांना हे दिले होते; मात्र काही तांत्रिक कारणास्तव ते खरेदी करणे शक्‍य झाले नव्हते.

विमानतळावरील सुरक्षा पाहता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) व रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांच्या जवानांकडेही बॉडी कॅमेरे आहेत. त्याच धर्तीवर आता राज्यातील पोलिसांना "बॉडी वॉर्म कॅमेरे' मिळणार आहेत.

अंधुक प्रकाशातही चित्रीकरण
गस्तीवरील पोलिसांना बॉडी कॅमेऱ्याद्वारे अनुचित घटनेदरम्यान व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येणार आहे. तसेच बेशिस्त चालकांकडून वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणे कमी होईल. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम मुंबईत सुरू होईल, असे गृह विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हे कॅमेरे कमी वजनाचे असल्यामुळे त्यांचा सहज वापर करता येईल. या कॅमेऱ्यातून रात्रीच्या अंधुक प्रकाशातही घटना टिपता येतील. तसेच ते जीपीएस, ब्ल्यूटुथ व वायफायने जोडले जाणार आहेत. त्यामुळे घटनास्थळावरील व्हिडीओ चित्रीकरण नियंत्रण कक्षाकडे पाठवणे सोपे जाईल.

Web Title: mumbai maharashtra news police body warm camera