शेतकऱ्यांचा नाद कराल तर कायमचे बाद व्हाल - राजू शेट्‌टी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 31 मे 2017

मुुंबई - सुलतानी व अस्मानी चक्रव्यूहात अडकलेल्या बळिराजाचा अंत पाहू नका. या बळिराजाचा नाद करू नका; अन्यथा कायमचे बाद करून टाकण्याची ताकद या शक्‍तीत आहे, असा सडेतोड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्‌टी यांनी आज सरकारला दिला. मुंबई ते पुणेदरम्यान सलग नऊ दिवस सुरू असलेल्या या आत्मक्‍लेश यात्रेचा आज समारोप झाला. सुमारे दहा हजारांहून अधिक शेतकरी या वेळी उपस्थित होते.

स्वाभिमानी संघटनेची "आत्मक्‍लेश यात्रा' आज भायखळा येथे पोलिसांनी रोखली. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत शेट्‌टी यांनी सरकारवर टोकाची टीका करत इशारा दिला. सरकारने 20 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात; अन्यथा तीव्र आंदोलनाचा सामना करण्यास तयार राहा, असा अल्टीमेटम दिला. शेट्टी म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजकारण करतो. मात्र, भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नाचेच राजकारण सुरू केले आहे. शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्‍वासन दिले नव्हते, असे सरकार म्हणत असल्याने या सरकारचा खोटारडेपणा समोर आल्याची टीका त्यांनी केली. भाजप सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे देशातील सर्व शेतकरी नेत्यांना एकत्र करून मोदी सरकारच्या छाताडावर बसण्याचा संकल्प सोडत असल्याची घोषणाच शेट्‌टी यांनी या वेळी केली. आत्मक्‍लेश यात्रा ही युद्धाची पूर्वतयारी असल्याचे सांगत शेट्‌टी यांनी एक महिना वाट पाहणार असल्याचा इशारा देत सरकारने सर्व मागण्या मान्य करण्याची सूचना केली. दरम्यान, यात्रेच्या समारोपानंतर राजू शेट्‌टी यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवनावर भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन त्यांनी राज्यपालांना दिले.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, तर कर्ज दुप्पट झाले. येत्या काळात राष्ट्रीय स्तरावर शेतकरी नेत्यांचे ऐक्‍य करू आणि केंद्र सरकारच्या छाताडावर बसू.''
- राजू शेट्टी, खासदार

संघटनेच्या निवेदनातील प्रमुख मुद्दे
शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा
स्वामिनाथन समितीचा अहवाल स्वीकारा
उसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये तातडीने द्या
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्तता करा
संपूर्ण तूर खरेदी करा आणि तूर खरेदीची सीआयडी चौकशी करा

Web Title: mumbai maharashtra news raju shetty talking