भिडे गुरुजींना आठ दिवसांत अटक करण्याची मागणी - आंबेडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - रखवालदाराकडून रखवाली काढून घ्यायची वेळ आली आहे. आमच्या नादी लागू नका. संभाजी भिडे यांना अटक झाली नाही तर विधानसभेला घेराव घालू. पुन्हा यायला लावू नका; आलोच तर हवे ते मिळाल्याशिवाय पुन्हा जाणार नाही. आज इशारा देऊन थांबतोय, पुढच्या वेळी येणार त्या वेळी माझी दादागिरी चालेल, असा इशारा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी सरकारला दिला. एल्गार मार्चच्या समारोपात ते बोलत होते.

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करीत सोमवारी मुंबईत 80 हजारांहून अधिक आंदोलकांसह एल्गार मार्च काढणाऱ्या आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलनाच्या समारोपात राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कोरेगाव भीमाप्रकरणी तीन महिने उलटूनही कारवाई होत नाही. या देशात यादवी आणायचीय का, असा प्रश्‍न करीत आंबेडकर म्हणाले, की दंगलीत सहभाग असल्याचे पुरावे दिल्यानंतर एकबोटे यांनी कोर्टात धाव घेतली. मात्र, कोर्टानेही त्यांना दंगलखोर ठरवले. कोर्टाच्या आदेशाने त्यांना अटक झाली. संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांचा खून करण्याचा संदेश दिला होता, असा सनसनाटी आरोपही या वेळी आंबेडकरांनी केला. मुख्यमंत्र्यांचा खून करा, असा संदेश भिडेंनी रावसाहेबांना दिला होता. पोलिस शांत झोपून आहेत. भिडे गुरुजी तुमचे गुरू असतील; परंतु ते दंगलखोर आहेत, असेही आंबेडकर म्हणाले.

गुजरातमधील माजी मंत्री हरेन पंड्या हत्या प्रकरणाचा संदर्भ देत आंबेडकर म्हणाले, की आम्ही गाडलेली भुते बाहेर काढू शकतो. ती बाहेर काढायची नसतील तर मुकाट्याने भिडेंना अटक करा. एक खूणगाठ बांधली पाहिजे. या देशात अद्याप राजेशाही आलेली नाही. लोकशाही टिकवायची आहे तर भाजपला हटवावे लागेल.

ओबीसी नेते श्रावण देवरे यांनी बाळासाहेब आंबेडकर पंतप्रधान होतील, त्या वेळी भिडेंना फाशी देऊ, असे सांगत भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचे आवाहन केले. विविध संघटनांनी एल्गार मार्चला पाठिंबा दिला होता. यात संभाजी ब्रिगेड, मुस्लिम संघटना, आम आदमी पक्ष, माकप आणि ओबीसी संघटनांचा समावेश होता.

आम्ही मोदींचे कैदी होणार नाही; मोदींना आम्ही कैदी करू. संभाजी भिडे यांना अटक झाली नाही तर विधानसभेला घेराव घालणार.
- प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, भारिप-बहुजन महासंघ

Web Title: mumbai maharashtra news sambhaji bhide arrest demand by prakash ambedkar