'आसाम बचाओ'साठी राज ठाकरेंना साकडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

स्वाधीन नारी शक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

स्वाधीन नारी शक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
मुंबई - आसाममधील स्वाधीन नारी शक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज येथे भेट घेतली. या भेटीत आसामी भाषा, आसामी संस्कृतीची सुरू असलेली गळचेपी, शेजारच्या प्रदेशातून होणारी घुसखोरी आणि या परप्रांतीयांनी उद्योगधंद्यांवर केलेला कब्जा, याविषयी राज यांना शिष्टमंडळाने माहिती दिली. तसेच सप्टेंबरमध्ये आसामला भेट देऊन "आसाम बचाओ' आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती या भेटीदरम्यान केली.

भाषिक अस्मिता आणि स्थानिकांचा रोजगारांवरील हक्क यावर स्वातंत्र्योत्तर काळात अनेक राज्यांत संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्रात मराठी अस्मिता आणि स्थानिक रोजगारावरील मराठी माणसाच्या हक्कांसाठी राज ठाकरे हे सातत्याने लढा देत आहेत. या लढ्याविषयी इतर राज्यांत भाषिक अस्मितेसाठी सुरू असणाऱ्या चळवळींच्या नेतृत्वांना कुतूहल आहे. या प्रश्‍नाबाबत राज हेच नेतृत्व देऊ शकतात, याची त्यांना खात्री वाटत आहे. नुकतीच कन्नड रक्षण वेदिकेने केंद्र सरकारच्या हिंदी लादण्याच्या निर्णयाविरोधात होणाऱ्या चर्चासत्रात मनसेने सामील व्हावे आणि राज यांनी या चळवळीचे देशव्यापी नेतृत्व करावे, अशी विनंती केली आहे.

मराठी अस्मितेसाठी लढा देणाऱ्या राज ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी देशभरात कुतूहल आहे. शुक्रवारी आसामी महिलांनी राज यांना राखी बांधून बहिणीच्या हक्काने आसामी भाषेचे रक्षण आणि स्थानिक आसामींच्या रोजगारासाठी सुरू केलेल्या "आसाम बचाओ' या आंदोलनाला पाठिंबा आणि मार्गदर्शन करण्याची विनंती केली.

Web Title: mumbai maharashtra news saw it raj thackeray for aasam bachao