पवार म्हणजे चालतीबोलती प्रयोगशाळा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मुंबई - शरद पवार म्हणजे चालतीबोलती प्रयोगशाळा आहे. गावापासून देशपातळीपर्यंत कोणती गोष्ट त्यांना माहीत नाही, असे होत नाही. राज्याच्या, देशाच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे या सदनातील दोन्हींकडील बाकांवरील सदस्यांना त्यांच्याबद्दल आदर आहे, असे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. पवारांच्या सर्व क्षेत्रांतील मुशाफिरीविषयी बोलताना विखे म्हणाले, की साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी फार मोठे काम केले आहे.

सर्व क्षेत्रांतील प्रामाणिक व धडपड्या लोकांना पवारांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला. त्यांनी अनेक तरुणांना राजकारणात संधी दिली. त्यांच्यामुळेच मी कॅबिनेट मंत्री झालो, असे माजी अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले. पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र मानले जातात. त्यांनी उद्योगपतींपासून शेतमजुरांपर्यंत अनेकांना मदत केली. राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री म्हणून त्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या प्रयत्नाने देशातील शेतकऱ्यांचे 71 हजार कोटींचे कर्ज माफ झाले, असेही ते म्हणाले.

पवार अनेकांशी राजकारणापलीकडे मैत्री करतात. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची मैत्री जगजाहीर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांची मैत्री आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशीही त्यांचे घनिष्ठ संबंध होते, असे पाटील म्हणाले.

विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी पवार हे थोर मुत्सद्दी नेते आहेत, असे मत व्यक्त केले. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, खेळ, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत पवार यांनी उल्लेखनीय काम केले. त्यांचे आम्हा कार्यकर्त्यांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले, असे शिंदे म्हणाले. ठाणे शहरातील एका क्रीडा संकुलाच्या नामकरणाचा वाद त्यांनी लीलया मिटवल्याचे ठाण्यातील लोकप्रतिनिधींच्या चांगलेच स्मरणात आहे, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य पतंगराव कदम यांनीही पवार यांच्या मोठेपणाचा गौरव केला. कदम म्हणाले, की पवार हे पंतप्रधानपदासाठी लायक नेते आहेत. पवार यांनी दोन चुका का केल्या, याचे मला कोडे आहे. त्या त्यांनी करायला नको होत्या; अन्यथा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे स्वप्न पूर्ण झाले असते. ते पंतप्रधानही झाले असते. केंद्रात आणि कॉंग्रेसमध्ये महत्त्वाच्या पदावर असताना पवार यांनी कॉंग्रेस सोडायला नको होती. ती त्यांची पहिली चूक होती. नंतर केंद्रात महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी असताना पवार राज्यात का परतले, ही त्यांची दुसरी चूक. राज्यात परतले नसते तर ते पंतप्रधान झाले असते.

गणपतराव मूळचे गांधीवादीच!
सभागृहाच्या सदस्यांनी या वेळी शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या कार्याचाही गौरव केला. गणपतरावांची विचारसरणी जरी डावी असली तरी ते मूळचे गांधीवादी आहेत, असे विखे-पाटील म्हणाले. रोजगार हमी योजनेत महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीनेच समान मजुरी मिळावी, यासाठी देशमुख यांनी आवाज उठवला, असे त्यांनी सांगितले; तर भारती विद्यापीठाने गणपतरावांना दिलेला "जीवनगौरव' पुरस्कार हा आम्ही त्यांचा नव्हे तर आमचा सन्मान समजतो, असे पतंगराव कदम म्हणाले. सभागृहात कसे वागावे, हे आम्ही देशमुख यांच्याकडून शिकलो, असे जयंत पाटील म्हणाले; तर देशमुख यांनी सभागृहाच्या माध्यमातून पुरोगामित्वाचा आवाज कायमच बुलंद केला, असे मत दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केले. शेकापचे धैर्यशील पाटील म्हणाले, की जागतिक स्तरावरील सांगोल्यातील सूतगिरणीला घरून डबा घेऊन जाणारा गणपतरावांसारखा संचालक लाभला, हे त्या गिरणीच्या सभासदांचे भाग्यच आहे. भारत भालके, आशीष शेलार, चंद्रदीप नरके, मंदा म्हात्रे आदींनीही देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला.

Web Title: mumbai maharashtra news Sharad Pawar is a rollicking laboratory!