कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी विशेष नियंत्रण कक्ष - सुभाष देशमुख

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मुंबई - 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017' च्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी राज्यस्तरीय विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

मुंबई - 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017' च्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी राज्यस्तरीय विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

राज्यात कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर विविध यंत्रणा कार्यरत असून, या सर्व यंत्रणेचे समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने मंत्रालयीन स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये घेण्यात आला होता. त्या नियंत्रण कक्षाची स्थापना मंत्रालयीन स्तरावर करण्यात आली आहे. असे सांगून देशमुख म्हणाले की, "या विशेष नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सहकार विभाग, राज्यातील सर्व बॅंका, माहिती तंत्रज्ञान विभाग आणि आपले सरकार पोर्टलद्वारे आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील अर्जांची माहिती या सर्वांचे समन्वयाचे कामकाज विशेष नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येणार आहे.''

नियंत्रण कक्ष प्रमुखपदी सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक मोहंमद आरिफ यांची नियुक्ती करण्यात आली असून, या कक्षात जिल्हा उपनिबंधक मुंबई-1 डी. एस. साळुंखे, मुंबई-2 प्रशांत सोनावणे, मुंबई-3, महेंद्र म्हस्के व इतर अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title: mumbai maharashtra news Special Control Room for loan waiver