शेतकऱ्यांना गुंड म्हणणे ही सरकारची "घमेंड'! - सुनील तटकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 जून 2017

मुंबई - कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव यासाठी सरकारच्या धोरणांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गुंड म्हणणे ही सरकारची घमेंड असल्याची आक्रमक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज केली. राष्ट्रवादीच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यभरातला शेतकरी सरकारच्या शेतकरी धोरणांविरोधात रस्त्यावर उतरला आहे. मात्र यात खरे शेतकरी नाहीत, राजकीय गुंड आहेत, असे म्हणून सरकारने शेतकऱ्यांचा अवमान केल्याचा आक्षेप तटकरे यांनी या वेळी घेतला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करणार असेल, तर शेतकरी हा राष्ट्रवादीचा असू शकत नाही काय, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादीचा यंदाचा वर्धापन दिन हा बळिराजाला समर्पित करण्यात आला असून, उद्या सरकारला बळिराजाची सनद देण्यात येणार असल्याची माहिती तटकरे यांनी या वेळी दिली. शेतकऱ्यांना हक्‍क मिळवून देणे ही राष्ट्रवादीचे उत्तरदायीत्व असून, जोपर्यंत कर्जमाफी व इतर सर्व मागण्या सरकार पूर्ण करत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही तटकरे यांनी दिला.

उद्या नवी दिल्लीत राष्ट्रवादीचा वर्धापन दिन कार्यक्रम होणार असून, महाराष्ट्रात प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर महापुरुषांना अभिवादन करून तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना बळिराजाची सनद दिली जाईल. तर मुंबईत मंत्रालयात मुख्य सचिवांना ही सनद दिली जाईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्व नेते 11 जूनपासून राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार असून, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राज्यभरात बूथ स्तरापासूनची बांधणी करणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.

Web Title: mumbai maharashtra news sunil tatkare talking