स्वाती साठे यांच्या निलंबनाची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 जुलै 2017

धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई - लैंगिक अत्याचार व मारहाण करून भायखळा कारागृहातील कैदी मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुरुंग उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

साठे या मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या व्हॉटस्‌अप मॅसेजवरून स्पष्ट होत आहे. हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याच्या तपासात अडथळे आणण्याचा व आरोपींना मदत करण्याचा त्यांचा हेतू या संदेशातून दिसून येतो, असा आरोप करत आरोपींना मदत करण्याची मानसिकता असलेली व्यक्ती वरिष्ठ तुरुंग अधिकारीपदी असणे योग्य नसल्याने साठे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांच्या हितसंबंधांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

साठे यांनी "महाराष्ट्र कारागृह' या कारागृह कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या व्हाट्‌सऍप ग्रुपवर मयत कैदी मंजुळा शेट्ये यांच्या प्रकरणाबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकला होता. शेट्ये याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना आपण मदत करू, असे त्यांनी यामध्ये म्हटले होते. त्यावरून हिरालाल जाधव या निलंबित कारागृह अधिकाऱ्याने तक्रार केली. हत्येचा आरोप असलेल्या कारागृह कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न साठे करत असल्याचा त्यांनी आरोप केला. त्यावरून या प्रकरणाला गंभीर वळण लाभले आहे.

Web Title: mumbai maharashtra news swati sathe suspend demand