राज्याच्या कर्जाची श्‍वेतपत्रिका काढा - सुनील तटकरे

संजय मिस्कीन
मंगळवार, 16 जानेवारी 2018

मुंबई - भाजप-शिवसेना सरकारने सत्तेत आल्यापासून राज्याच्या तिजोरीवर कर्जाचा भरमसाठ बोजा टाकल्याचा आरोप करत सध्या कर्जाचा आकडा पाच लाख कोटी रुपयांच्या घरात गेला आहे; मात्र शेतकरी कर्जमाफी, अनुदान यासह ग्रामीण भागातल्या पायाभूत योजना बंद आहेत. त्यामुळे हे एवढे कर्ज कशासाठी काढले? याचा हिशेब राज्यातील जनतेला देण्यासाठी कर्जाची श्‍वेतपत्रिका काढा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज केली.

राज्यात काही शहरांतच मेट्रोच्या विकासाची कामे दिसत असली तरी स्मार्ट सिटीचा बोजवारा उडाला आहे. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या रकमेपेक्षा अधिकच्या पुरवणी मागण्या एका वर्षात सरकार सादर करत आहे. तसेच कर्ज घेत असताना आता ओव्हरड्राफ्ट घेण्याची नामुष्की सरकारवर आल्याने श्‍वेतपत्रिका काढण्याची मागणी आगामी अधिवेशनात लावून धरणार असल्याचे तटकरे म्हणाले.

सध्या शेतकरी कर्जमाफी देण्याचा निर्णय अजूनही सरकार पाळू शकलेले नाही. हिवाळी अधिवेशनात बोंड अळीने नुकसान झालेल्या पिकांना एकरी 30 हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले; मात्र अद्याप याबाबत एक अवाक्षरही सरकारने काढलेले नाही. त्यामुळे एवढे कर्ज कशासाठी काढले, असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादीने विदर्भात काढलेल्या हल्लाबोल पदयात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आत्ता हल्लाबोलचा दुसरा टप्पा मराठवाड्यातून उद्यापासून सुरू होत असून, इथेही जनतेचा उदंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Web Title: mumbai maharashtra news Take the white paper of state loan