विश्‍वासदर्शक ठरावावर खडाजंगी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आणलेल्या अविश्‍वास ठरावाऐवजी सरकारने विश्‍वासदर्शक ठराव मांडत तो लगबगीने शुक्रवारी (ता. २३) मंजूर केला. त्यावरून सोमवारी (ता. २६) सभागृहाचे कामकाज सुरू होताच सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आल्याने चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले.

मुंबई - विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आणलेल्या अविश्‍वास ठरावाऐवजी सरकारने विश्‍वासदर्शक ठराव मांडत तो लगबगीने शुक्रवारी (ता. २३) मंजूर केला. त्यावरून सोमवारी (ता. २६) सभागृहाचे कामकाज सुरू होताच सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आल्याने चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले.

सत्ताधाऱ्यांनी शुक्रवारी केलेले कामकाज म्हणजे विधानसभेच्या इतिहासातील कधीही न झालेले चुकीचे कामकाज आहे, असा आरोप विरोधकांनी केला; तर आम्ही केलेले कामकाज हे नियमानुसार आणि प्रथेनुसारच आहे, असे सांगत आम्हीच बरोबर असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आणलेल्या अविश्‍वास ठरावाची कोणतीही चर्चा न करता सत्ताधाऱ्यांनी विश्‍वासदर्शक ठराव आणून नियमाची पायमल्ली केली असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री फडणवीस आणि संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सभागृहात निवेदन करताना आम्ही जे कामकाज करीत आहोत, ते नियमानुसार असून त्यात कोणतेही चुकीचे काम केले नसल्याचे सांगितले.

काँग्रेस, राष्ट्रवादीची घोषणाबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवेदनानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. त्यामुळे सुरवातीला १० मिनिटांसाठी आणि त्यानंतर अर्धा तासासाठी व पुन्हा १५ मिनिटांसाठी तीन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

एल्गार मोर्चाचे तीव्र पडसाद
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी ॲड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढलेल्या एल्गार मोर्चाचे पडसाद विधिमंडळातही उमटले. दोन्ही सभागृहांत विरोधकांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली. विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र, हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले. 

मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या दोघांची नावे ‘एफआयआर’मध्ये आहेत. त्यातील मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यास अडीच महिने लागतात. तर, संभाजी भिडे सगळीकडे फिरत असून, पत्रकार परिषदा घेऊन वावरतायंत. मात्र, राज्य सरकारला ते सापडत नाहीत. यावरून राज्य सरकार भिडेंना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केला.

भिडेंच्या अटकेची मागणी
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह भाई जगताप, कपिल पाटील, जोगेंद्र कवाडे या आमदारांनी संभाजी भिडेंच्या अटकेची जोरदार मागणी केली. एकबोटे स्वत:हून अटक झाले. मात्र, दुसरा आरोपी संभाजी भिडे यांना अटक करण्यात आली नाही, याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचे आहे का, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. भिडेंना अटक होत नाही तोपर्यंत असे मोर्चे निघणार आहेत. त्यामुळे सर्व विषय बाजूला ठेवून भिडे यांच्या अटकेबाबत चर्चा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. या सरकारमध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना सुरू असून, समाजकंटकांना सरकारची भीती राहिलेली नाही, असा आरोप मुंडे यांनी केला.

‘छत्रपती शाहूंना ‘भारतरत्न’ द्या’
छत्रपती शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या, अशी मागणी कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज विधानसभेत केली. क्षीरसागर म्हणाले, की कोल्हापूरच्या विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय योग्यच आहे. या निर्णयासोबतच सरकारने रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्यावा. त्यासाठी राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवून तशी शिफारस करावी.

कोल्हापुर विमानतळास राजाराम महाराजांचे नाव
कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. हा ठराव एकमताने विधानसभेने मंजूर केला. आता हा प्रस्ताव भारतीय विमान प्राधिकरणाकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर तो केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की निव्वळ नाव देऊन काही होणार नाही तर कामाला गती दिली पाहिजे. 

Web Title: mumbai maharashtra news vidhansabha session