BMC Election : ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ युतीला खीळ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC Election : ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ युतीला खीळ?

BMC Election : ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ युतीला खीळ?

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर एकत्र येऊन शिवशक्ती-भीमशक्ती युती अस्तित्वात येण्याची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान ‘राजगृह’ येथे भेट दिल्याने या भविष्यातील युतीला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट राजकीय नव्हती. तसेच महाविकास आघाडीचे काही ठरत नाही, तोपर्यंत राजकीय चर्चेचे पुढे काही होईल, असे मला दिसत नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते म्हणाले, की इंदू मिलच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री येणार असल्याचा निरोप मला कालच मिळाला होता.‘राजगृहा’ला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत इंदू मिलच्या स्मारकाबाबत चर्चा झाली. मुंबईमध्ये इंदू मिलची १४ एकर जागा आहे. मुंबई भारताचे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. मागील सरकारच्या काळात झाले नाही. तुमच्या कार्यकाळात त्या जागेवर आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे येत्या काही दिवसात एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे शिवसेना-वंचित बहुजनच्या युतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पोर्टलचे उद्‍घाटन येत्या २० रोजी आहे. प्रबोधनकार आणि बाबासाहेबांचा संबंध जवळचा होता. त्यामुळे त्यांनी मला बोलावले. महाविकास आघाडीचे काही ठरत नाही, तोपर्यंत राजकीय चर्चेचे पुढे काही होईल, असे मला दिसत नाही,'' अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ठाकरे यांच्या कार्यक्रमाआधीच मुख्यमंत्री -आंबेडकर यांची भेट झाल्यामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाजपबरोबर जाऊ शकत नाही

भाजपशी युती करण्यासंबंधी विचारले असता प्रकाश आंबेडकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली. आम्ही भाजपबरोबर जाऊ शकत नाही. तसेच जे कोणी भाजपबरोबर जातील त्यांच्यासोबत न जाण्याची आमची भूमिका आहे, असे सांगत शिंदे गटाशी युती करण्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला.

डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याची जबाबदारी मंत्री दीपक केसरकर यांना दिली. पुढील आठ दिवसात अहवाल सादर करायला सांगितला आहे. इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र उभे राहील, अशी अपेक्षा आहे.

- प्रकाश आंबेडकर, प्रमुख, वंचित बहुजन आघाडी