प्रशिक्षणार्थींचा रेल रोको

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 मार्च 2018

‘रेल्वेच्या ९० हजार जागांसाठी सध्या ऑनलाइन भरतीप्रक्रिया सुरू आहे. मुंबईतील आंदोलनकर्त्यांनी त्यासाठी अर्ज करावेत. राखीव कोट्याबाबतचा निर्णय रेल्वेने सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांच्या व राज्यघटनेच्या तरतुदींनुसारच घेतलेला आहे.
- पीयूष गोयल, रेल्वेमंत्री

मुंबई/नवी दिल्ली - कायमस्वरूपी नोकरीसह विविध मागण्यांसाठी रेल्वेत प्रशिक्षण (ॲप्रेंटीस) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी आज मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकात रेल रोको केला. सकाळी सात वाजल्यापासून तब्बल साडेतीन तास या विद्यार्थ्यांनी रुळांवर ठाण मांडल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळित झाली होती. पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याने विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. रेल्वे प्रशासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर १०.४५ वाजता आंदोलन स्थगित झाले. 

राज्यातील कानाकोपऱ्यातून प्रशिक्षणार्थी आंदोलनासाठी येथे दाखल झाले होते. माटुंगा स्थानकात मंगळवारी सकाळी ६.५४ वाजता अप धीम्या मार्गावरील ठाणे-सीएसएमटी लोकल त्यांनी रोखून धरली. प्रशिक्षणार्थींना दिलेले २० टक्के आरक्षण रद्द करावे, रेल्वे जीएम कोट्यातून पूर्वी होणारी भरतीप्रक्रिया पुन्हा सुरू करावी, रेल्वेतील अडीच लाख रिक्त जागा भराव्यात आदी प्रमुख मागण्या करीत विद्यार्थ्यांनी रेल रोको केला. प्रशिक्षणार्थींनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली होती. लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेत ते आक्रमक झाले. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे संतप्त प्रशिक्षणार्थींनी दगडफेक केली. या घटनेत एक पोलिस उपनिरीक्षक, पाच लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे सहा जवान जखमी झाले. शेकडो विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

शिवसेनेच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने दुपारी गोयल यांची भेट घेऊन २० टक्‍क्‍यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीचे निवेदन दिले. मुलुंडचे खासदार राहुल शेवाळे, शिवसेनेचे संसदीय नेते आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तीकर अरविंद सावंत, भावना गवळी, डॉ. श्रीकांत शिंदे, चंद्रकांत खैरे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

Web Title: mumbai news apprenticeship student rail roko agitation