कर्करोगाशी लढताना ‘तो’ बनला डॉक्‍टर!

कर्करोगाशी लढताना ‘तो’ बनला डॉक्‍टर!

मुंबई - एमबीबीएस परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत हॉल तिकीट मिळालेले नव्हते... ‘केमो’ने हात कमजोर झालेला... परीक्षेसाठी येणाऱ्या अडथळ्यांमुळे शिक्षण अर्धवट सोडून देण्याचा विचारही मनात आला... मात्र नंतर जिद्दीने सर्व अडथळ्यांवर मात करीत कर्करोगाशी दोन हात करून तन्वीर अहमद याने एमबीबीएसची परीक्षा दिली. तो केवळ उत्तीर्ण झाला नाही तर त्याने सुवर्णपदकही पटकावले. भविष्यात कर्करोगाच्या बालरुग्णांसाठी काम करण्याची त्याची इच्छा आहे.

बेळगाव येथे एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या तन्वीरच्या नाकपुडीतून अचानक रक्तस्राव झाला. नंतर त्याला कोणताच त्रास झाला नाही. मात्र १५ दिवसांनी त्याचा डावा कान दुखू लागला. कान-नाक-घसा विभागातील डॉक्‍टरांनी त्याची तपासणी केली. त्यात त्यांना काही आढळले नाही. काहीच आजार नसल्याची खात्री करण्यासाठी तन्वीरचे सिटीस्कॅनही झाले. त्या वेळी त्याचा डावा गाल आणि कानात ‘ट्युमर’ असल्याचे डॉक्‍टरांच्या लक्षात आले. 

तन्वीर म्हणाला, ‘सुरुवातीला मी हादरूनच गेलो. डॉक्‍टरांनी या आजाराचे भले मोठे नाव सांगितले. मला त्यातला ‘मॅलिग्नसी’ हा शब्द ओळखीचा होता. त्यातून आजाराची भयानकता लक्षात आली. टाटा कर्करोग रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेत कुटुंबासह तेथे पोहोचलो.’ उपचार घेत असतानाच तन्वीरने एमबीबीएसची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 

एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात चांगले गुण मिळाले. उपचारासाठी कॉलेजला दांड्या होत होत्या. त्या वेळी विद्यापीठाने परीक्षेला बसण्यास मनाई केली. तत्कालीन कुलगुरूंची भेट घेऊन परीक्षेला बसू देण्याची विनंती केली. त्याच वेळी कान-नाक-घसा, प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिन विभागातील इंटर्नशिप एकाच वेळी केली. माझे इतर सहकारी परीक्षेचा अभ्यास करत असताना मी इंटर्नशिप पूर्ण करत होतो, असे तन्वीरने सांगितले. 

परीक्षेच्या आदल्या दिवशी हॉल तिकीट मिळाले. हॉल तिकिटासाठी अनेक चकरा माराव्या लागल्या. त्यामुळे एमबीबीएसचे शिक्षण अर्धवट सोडण्याचा विचारही मनात आला होता; पण वेळीच कुलगुरूंची भेट घेतल्याने अडथळा दूर झाला आणि अभ्यासाला लागलो. केमोमुळे बधिर झालेल्या हाताने परीक्षा देईन, अशी खात्री नव्हती. उलट्याही होत असल्याने टाटा कर्करोग रुग्णालयातील डॉ. तुषार व्होरा यांच्या मदतीने केमोचे वेळापत्रक वेळोवेळी बदलून घेतले; पण केमो आणि परीक्षा असे एकत्र जमणारे नसल्याने रिस्क घ्यावी लागली. त्या वर्षी कान-नाक-घसा विभागात सुवर्णपदक मिळाले, असे सांगताना तन्वीरचा चेहरा खुलला होता.  

उपचारांनंतर दीड वर्षाने कॉलेजला गेलो. त्या वेळी मित्र-मैत्रिणी बोलणे-भेटणे टाळत होते. केस गळाले होते, गालावर मोठा व्रण होता आणि रेडिएशनने चेहरा काळवंडला होता; पण त्यावर मात करण्यासाठी भरपूर पाणी प्यायचो, चांगले अन्न खायचो. टाटा कर्करोग रुग्णालयात उपचार मिळाल्यामुळे जगू शकलो. याच रुग्णालयाच्या बालकर्करोग विभागात डॉक्‍टर म्हणून काम करण्याचे स्वप्न आहे, असे तन्वीरने सांगितले. सध्या तो कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात बालरोग विभागात प्रशिक्षण घेत आहे. 

लहानग्यांसारखे जगणे पसंत केले
टाटा कर्करोग रुग्णालयात उपचार घेताना कधी वृद्ध; तर कधी बालरुग्ण दिसायचे. वृद्ध रुग्ण थकलेले, कंटाळलेले वाटायचे; मात्र डोक्‍यावरचे विरळ झालेले केस, हाताला टोचलेल्या सुया आदी त्रासांतून हसत-खेळत दिसणाऱ्या बालकांमुळेही मला ऊर्जा मिळाली आणि मीही त्यांच्यासारखे जगण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कर्करोग झालेला असतानाही मला सकारात्मक जगता आले. परिणामी; कर्करोगावर मात करण्यात यश आले, असे तन्वीर अहमद आत्मविश्‍वासाने सांगत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com