संप पुकारणार्‍या शेतकर्‍यांशी मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

सरकार तर प्रामाणिक आहेच, शेतकर्‍यांनी सरकारच्या खांद्याला खांदा लावून या प्रयत्नांत सहभागी व्हावे, आपण सारे मिळून ही परिस्थिती निश्चितपणे बदलू!

मुंबई : येत्या 1 जूनपासून संपाची हाक देणार्‍या शेतकर्‍यांसोबत आज (मंगळवार) मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली. दरम्यान, पुणतांब्यातील शेतकऱ्यांसोबत झालेली ही बैठक निष्फळ ठरल्याचे शेतकरी गटाच्या सूत्रांनी सांगितले.

या चर्चेवेळी मंत्री सदाभाऊ खोत हे सुद्धा उपस्थित होते. 1 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबत मार्ग काढण्यासाठी किसान क्रांती शेतकरी संघटना आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा बंगल्यावर बैठक झाली. त्यामुळे यावेळी नेमकं काय घडलं याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

सरकारमधील सूत्रांनी या चर्चेबाबत माहिती दिली. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेतील मुद्दे थोडक्यात...

  • शेतकर्‍यांच्या सर्वच मागण्यांबाबत सरकार अतिशय सकारात्मक आहे. शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी येणार्‍या प्रत्येक सूचनेचे, कल्पनेचे, मार्गदर्शनाचे स्वागतच आहे.
  • शेतकरी कर्जबाजारी होण्याचे मुख्य कारण हे कमी उत्पादकता, वीज न मिळणे, सिंचनसुविधा कमी असणे हे आहे. या सर्व बाबतीत मोठी कामगिरी या दोन वर्षांत करण्यात आली आहे आणि अजूनही प्रयत्न होत आहेत.
  • शेतीत मोठी गुंतवणूक राज्य सरकार करीत आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सिंचनसुविधा, वीज कनेक्शन सुद्धा मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहे.
  • एनडीडीबीच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यांमध्ये काम सुरू झाले, तेथे शेतकर्‍यांना दुधाला प्रतिलिटर 4 रूपये अधिकचे मिळत आहेत.
  • दुधाचा राज्याचा स्वत:चा सिंगल ब्रँड विकसित करण्याचा प्रयत्न सरकार करते आहे.
  • शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी अन्नप्रक्रिया, शेतमाल प्रक्रिया आदींसाठी पुढाकार घेतला जात आहे. आजच त्यासंदर्भातील धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी प्रदान केली आहे.
  • माफक दरात शेतकर्‍यांना वीज मिळावी, म्हणून सौर फीडरसंदर्भातील निर्णय सुद्धा आजच मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. 12 तास वीज देण्याचा प्रयत्न यामाध्यमातून होणार आहे.
  • सरकार तर प्रामाणिक आहेच, शेतकर्‍यांनी सरकारच्या खांद्याला खांदा लावून या प्रयत्नांत सहभागी व्हावे, आपण सारे मिळून ही परिस्थिती निश्चितपणे बदलू!
Web Title: mumbai news CM Devendra Fadnavis meeting farmers strike