दर्डा भूखंडप्रकरणी राज्यपालांकडे तक्रार करू - पंकज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 जून 2017

मुंबई - 'लोकमत वृत्तपत्र समूहा'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तथा माजी खासदार विजय दर्डा व त्यांच्या कुटुंबीयांनी राजकीय पदाचा गैरवापर करत नागपूर येथील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात तब्बल नऊ भूखंड अनधिकृतरीत्या गिळंकृत केले आहेत. या गैरव्यवहारप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत; पण तरीही दर्डा कुटुंबीयांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे आता आपण राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहोत. न्यायालयातही लवकरच याचिका दाखल करणार आहोत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते पंकज ठाकरे यांनी "सकाळ'ला दिली.

ठाकरे यांनी दोन महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह दर्डा यांच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला होता. दर्डा यांच्यावर कारवाई झाली नाही, तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी त्या वेळी दिला होता. राज्य सरकार कारवाई करण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे आम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत. तसेच न्यायालयातही जाणार आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले.

दर्डा यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात हे बहुतांश भूखंड हडप केले आहेत. एक भूखंड हडपताना दुसऱ्या भूखंडाविषयीची माहिती लपवून ठेवायची आणि सतत भूखंड हडप करायचे, असे प्रकार दर्डा कुटुंबीयांनी केले आहेत. यासाठी त्यांनी एमआयडीसीचे अधिकारी, तत्कालीन उद्योगमंत्री यांच्याशी संधान साधून हे भूखंड हडपल्याचे कागदपत्रांतून दिसून येत आहे.

अपंग, मतिमंद मुलांसाठी राखीव असलेला भूखंडही दर्डा कुटुंबीयांनी हडपला आहे, असेही ठाकरे म्हणाले. दर्डा यांचे हे भूखंड प्रकरण अत्यंत गंभीर आहे. फडणवीस सरकारकडून या प्रकरणी कारवाई होईल, असे आम्हाला वाटले होते; पण कारवाई करण्यास सरकारकडून अक्षम्य दिरंगाई होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण सतत पाठपुरावा करणार असल्याचेही ठाकरे म्हणाले.

भूखंडांचे श्रीखंड (एकूण 40 एकरांचा गैरव्यवहार)
1) भूखंड क्र.बी -192 ... 40,000 चौ.मी चे (10 एकर) मे. लोकमत मीडिया लि. ला वाटप
2) भूखंड क्र. बी-192/1 ... 16 000 .88चौ.मी (4 एकर) रचना दर्डा यांच्या मे. मीडिया वर्ल्ड एंटरप्रयाझेसच्या नावे
3) भूखंड क्र.192पार्ट... 16 000 चौ.मी चे (4 एकर) लोकमत न्यूज पेपरच्या नावे
4) भूखंड क्र .बी207 ... 6790 चौमीचे (1.69 एकर) वाटप लोकमत न्यूज पेपर लि.
5) भूखंड क्र. बी-208 ...1800 चौमीचे (अर्धा एकर) वाटप विना इन्फोसिस या नावे
6) भूखंड क्र.आरएच -18 ... 51750 चौमी (सुमारे 13 एकर) वाटप लोकमत कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था यांच्या नावे निवासी प्रयोजनासाठी
7) भूखंड क्र पी -60..... 3997.30 चौमीचे (एक एकर) वाटप जैन सहेली मंडळाला
8) भूखंड क्र. पीएल 7 - 16 हजार चौमीचे (चार एकर) वाटप लोकमत समूहाच्या कामगारांसाठी
9) भूखंड आर.एक्‍स. 1- 6 हजार चौमी (दीड एकर) वर दर्डा परिवाराचे भव्य गेस्ट हाउस आहे

Web Title: mumbai news Complain to the governor of Darda plot