पाचशेच्या बनावट नोटाही बाजारात?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

मुंबई - सुमारे साडेसात लाखांच्या बनावट नोटांसह महसूल गुप्तवार्ता विभागाने (डीआरआय) रविवारी दोघांना नवी मुंबईतील सानपाडा येथून अटक केली. अटक आरोपींकडे दोन हजारच्या ३६८ बनावट नोटांसह एक पाचशेची बनावट नोटही सापडली. पाचशेच्या इतर नोटा आरोपींनी वितरित केल्याचा संशय ‘डीआरआय’अधिकाऱ्यांना आहे.

बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी देशात गतवर्षी नोटाबंदी राबवण्यात आली होती. त्यानंतर आलेल्या दोन हजारच्या बनावट नोटाही तस्करांनी तयार केल्या. त्यानंतर ८ नोव्हेंबर २०१६ ला बाजारात आलेल्या पाचशेच्या बनावट नोटाही तयार केल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नवी मुंबईतील सानपाडा स्थानकाजवळील मॉडर्न गेस्ट हाउसजवळ शनिवारी दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील एकाकडे एक पाचशेची बनावट नोट सापडली. त्यातून पाचशेच्या बनावट नोटाही तयार करण्यात आल्याचे उघड झाले. याबाबत ‘डीआरआय’चे सहसंचालक समीर वानखेडे  यांनी उर्वरित पाचशेच्या नोटा आरोपींनी वितरित केल्याचा संशय व्यक्त केला. मॅफको मार्केटजवळ काही संशयित बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार काल सापळा रचून अझरुद्दीन राजुद्दीन शेख (रा. कारावे, नवी मुंबई) व अब्दुल साबीर अब्दुल सुभान (रा. माहिम) यांना ताब्यात घेतले. 

बांगलादेश कनेक्‍शन 
बनावट नोटांच्या तस्करीमध्ये बांगलादेश कनेक्‍शन उघड झाले आहे. चौकशीदरम्यान अझरुद्दीन शेख याने कोलकता येथून नोटा आणल्याचे सांगतानाच त्या बांगलादेशमधून आल्याचे सांगितले; तर सुभान हा बनावट नोटा वितरणात सक्रिय आहे. या कामात त्याला ३० टक्के कमिशन मिळते. बंगळूरमधील म्होरक्‍यासाठी तो काम करतो, असे त्याने चौकशीत सांगितले. 

Web Title: mumbai news Fake currency DRI