मुसळधार पावसाने पर्यटनस्थळे बहरली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

सलग सुट्यांमुळे कुटुंबासह फिरण्याचा बेत आखला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याबरोबरच समुद्रकिनाऱ्यांवरही जाणार आहोत. पावसाने जोरदार सुरुवात केल्याने खूप आनंद झाला आहे. मनसोक्त पावसाचा आनंद घेत आहोत. 
- संदीप बनकर, पर्यटक, मुंबई 

पाली - शनिवार ते सोमवार जोडून सुट्या आणि शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बहरली आहेत. समुद्रकिनारे व धार्मिक स्थळांवर पर्यटकांनी, भाविकांनी गर्दी केली आहे. पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. 

काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. नद्या व धबधब्यांना पाणी नव्हते. परिणामी पावसाळी पर्यटनाचा श्रीगणेशा झाला नव्हता. शनिवार रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने ठिकठिकाणी धबधबे दृष्टीस पडू लागले आहेत. सलग सुट्यांत पावसाची मौज अनुभवण्यासाठी पर्यटक बाहेर पडले आहेत. पाली व महाड येथील अष्टविनायक आणि हरिहरेश्वर येथील तीर्थक्षेत्रावर भाविकांची रीघ लागली होती. अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड, दिवेआगर आदी समुद्रकिनाऱ्यांवरही पर्यटकांची गर्दी होती. पावसात चिंब भिजून पर्यटक सुटीचा आनंद घेत होते. पावसाचा जोर असाच राहिल्यास दोन-तीन दिवसांत मोठे धबधबे वाहू लागतील. जिल्ह्यातील निसर्गरम्य अशा सुकेळी, पडसरे, फणसाड, आषाणे-कोषाणे, ताम्हाणी घाट, कुंभे आदी ठिकाणच्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. सलग तीन दिवस सुट्यांमुळे पर्यटक व भाविक मोठ्या प्रमाणात पर्यटन व तीर्थाटनासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थ तसेच इतर विक्रेत्यांचा व्यवसाय चांगला होत आहे. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पर्यटकांचा उत्साह वाढला आहे, अशी माहिती पाली येथील व्यावसायिक मनोज मोरे यांनी दिली. 

Web Title: mumbai news Heavy rains tourist spot