शिक्षणमंत्र्यांचे मोदीप्रेम वादात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

मुंबई - राज्यातील पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजनेंतर्गत पुस्तके खरेदी करताना राज्याच्या शिक्षण विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमाचा वर्षाव केला आहे. थोर व्यक्तींपेक्षा मोदी यांच्या चरित्राची माहिती देणाऱ्या पुस्तकांवर चक्क 59 लाख 42 हजारांचा खर्च केल्याने हे प्रेम चर्चेत आले असून, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या पुस्तकांवर शिक्षण विभागाने मराठी भाषेतील 72 हजार 933 प्रती, इंग्रजीतील 7148, गुजरातीत 33 आणि हिंदीतील 425 प्रती खरेदी केल्या आहेत. मात्र, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुस्तक खरेदीसाठी केवळ तीन लाख 25 हजार रुपये खर्च केले आहेत.

गांधीजींवरील पुस्तकांसाठी सम्राट प्रकाशनाकडून 2675 प्रती, डायमंड पॉकेटकडून गुजराती भाषेतील 33 प्रती, निशिगंध प्रकाशनाकडून 7260 प्रती शिक्षण विभागाने खरेदी केल्या आहेत; तर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 78 हजार 388 पुस्तक प्रतींसाठी 24 लाख 28 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्राची माहिती देणाऱ्या 78 हजार 348 प्रती शिक्षण विभागाने खरेदी केल्या. त्यासाठी 22 लाख 63 हजार रुपये रक्कम खर्च करण्यात आली.

खरेदी पारदर्शक - तावडे
पुस्तक खरेदीप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाली आहे. मोदी यांच्यावरील पुस्तके सर्वाधिक खरेदी केल्याचा दावा चुकीचा आहे. शिवाजी महाराज, अब्दुल कलाम, शाहू महाराज आणि साने गुरुजी यांच्या चरित्रावरील पुस्तक खरेदीची संख्याही मोठी आहे, असा दावा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला; परंतु या पुस्तकांसाठी खर्च केलेली रक्कम त्यांनी सांगितली नाही.

Web Title: mumbai news maharashtra news book vinod tawde narendra modi dispute