मृत्यूच्या दाढेतून परतणारे शेतकरी वाऱ्यावरच

दीपा कदम
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

अमरावती विभागात 12 हजार 308 शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रयत्न

अमरावती विभागात 12 हजार 308 शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई - मरणानेही नाकारलेले हजारो शेतकरी मृत्यूच्या दाढेतून दररोज परत येताहेत; पण त्यांची दखलही कोणी घेत नाही. केवळ अमरावती विभागात जानेवारी 2016 ते ऑक्‍टोबर 2017 महिन्यात तब्बल 12 हजार 308 शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी 683 शेतकऱ्यांना मृत्यूने कवटाळले आहे. मात्र, मृत्यूच्या प्रयत्नात असणाऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारकडे कोणतीही यंत्रणा नाही.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांत शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. जानेवारी 2016 ते ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत अमरावती महसूल विभागतील 7 जिल्हा रुग्णालयांत विष प्राशन करून 683 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 12 हजार 308 शेतकऱ्यांनी विष प्राशन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांचा मृत्यू झाला नसल्याची माहिती राज्य सरकारच्या विशेष पाहणी अहवालातून पुढे आली.

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षी कीटकनाशकाची फवारणी करताना शेतकरी आणि शेतमजुरांना विषबाधा होऊन मृत्यू झाला होता. या तपासणी पथकाच्या अहवालात विष प्राशन करून मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी देण्यात आली आहे. यानुसार विष प्राशन करण्याचे सर्वाधिक प्रमाण अमरावती विभागात दिसून येते. 2016 मध्ये 1781 (मृत्यू 119) तर 2017 ऑक्‍टोबरपर्यंत 1915 (मृत्यू 98) जणांनी विष प्राशन केले.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या शेतकऱ्यांना नैराश्‍यातून बाहेर काढून त्यांना मदतीचा हात देण्याची आवश्‍यकता असते. मात्र, यंत्रणा नेमकी तिथेच कमी पडत असल्याचे निरीक्षण वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी "सकाळ'कडे बोलताना व्यक्‍त केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांना नैराश्‍यातून बाहेर काढण्यासाठी प्रेरणा प्रकल्प हाती घेण्यात आला होता; मात्र तो पूर्ण अपयशी ठरला.

राज्य सरकारकडे पुरेसे समुपदेशकच नसल्याने या शेतकऱ्यांना नैराश्‍यातून बाहेर काढणार कसे? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने 2006 मध्ये विदर्भात केलेल्या एका पाहणीनुसार साडेतीन लाख शेतकऱ्यांना तीव्र नैराश्‍याने ग्रासले होते. आत्महत्येमुळे मृत्यू होणारे 10 टक्‍के असतात, तर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या 90 टक्‍के असते. या 90 टक्‍क्‍यांना आत्महत्या करणाऱ्याप्रमाणेच मानसिक आणि आर्थिक मदतीची गरज असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली.

विष प्राशन केलेले मात्र ज्यांचा मृत्यू झालेला नाही अशा शेतकऱ्यांचे मराठवाड्यातही मोठे प्रमाण असून, त्याचीही माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते अमर हबीब यांनी केली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांत शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक असून, त्यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा 309 चा गुन्हा दाखल केला जातो. मात्र, त्यांच्या समस्यांवर मात करण्यासाठी सरकारकडे उपाययोजना नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणारे हे सर्वाधिक वंचित असतात, त्यांना तातडीने मदतीची आवश्‍यकता असल्याकडे हबीब यांनी लक्ष वेधले.

Web Title: mumbai news maharashtra news farmer suicide state government