आंबेडकर-आठवलेंना वगळून विधिमंडळावर मोर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणानंतर राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी विधान भवनावर दलित समाजातील सर्व संघटनांच्या वतीने संविधान परिवाराच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या महामोर्चापासून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांना लांब ठेवण्यात येणार असल्याची माहिती संविधान महामोर्चाच्या निमंत्रण समितीने दिली. या मोर्चात भाजप-सेना सरकार व आरएसएसच्या विरोधात असून संविधान मानणाऱ्या पक्षसंघटनांचा हल्लाबोल असणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी चेंबूर येथील महाराणा हॉटेलात आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, अर्जुन डांगळे, गंगाराम इंदिसे, मनोज संसारे, गायक विष्णू शिंदे, अशोक कांबळे, अमोल बोधिराज, मोहिनी अनावकर आणि अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे नेते आणि भीम आर्मीचे नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

या वेळी संविधान परिवार मोर्चाच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात जाहीर सभा घेण्यात येणार असून, 12 फेब्रुवारीपासून सभा घेण्यास सुरवात करण्यात येणार आहे. याची सुरवात नाशिकपासून करण्यात येणार असून त्यानंतर मनमाड, पुणे, कराड (सातारा), कल्याण आणि उल्हासनगर, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, सोलापूर, ठाणे, नवी मुंबई यासह विविध ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येणार आहेत.

Web Title: mumbai news maharashtra news vidhimandal rally