महात्मा फुले यांच्यावर चित्रपट

Mahatma-Phule
Mahatma-Phule

मुंबई - थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले यांचे जीवनकार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचावे यासाठी त्यांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती नामांकित आणि व्यावसायिक संस्थेकडून करण्यात येणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांत तयार होणारा हा चित्रपट वर्षभरात पूर्ण करण्यात येणार असून, यासाठी ई-निविदा मागवून संस्थेची निवड करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

महात्मा फुले यांचे संघर्षमय जीवन व कृतिशील विचारांचा आढावा या चित्रपटात घेण्यात येणार असून, तो ऐतिहासिक सत्यावर आधारित असण्यासह या थोर महात्म्याचे जीवनकार्य यथार्थपणे साकारले जावे, यासाठी शासनाकडून तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. दर्जेदार चित्रपट निर्मितीचा अनुभव आणि वितरणाची सक्षम व्यवस्था असणाऱ्या संस्थांकडून ई-निविदा मागविण्यात येऊन पारदर्शक पद्धतीने संस्थेची निवड करण्यात येईल.

सासू-सासऱ्याच्या सुश्रुषेसाठी बदलीची मुभा
शासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांना आपल्या पतीच्या आई-वडिलांच्या गंभीर आजाराच्या कारणास्तवही महसुली विभाग बदलून मिळण्यासाठी विनंती अर्ज करण्यास परवानगी देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्यासाठी महसुली विभाग वाटप नियम - 2015 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक गरजू महिला अधिकाऱ्यांची सोय होणार आहे.

राज्य शासनातील गट "अ' व गट "ब' (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम - 2015 तयार करण्यात आले आहेत. या नियमानुसार शासकीय अधिकाऱ्यांना स्वत: किंवा आपला जोडीदार, मुले अथवा अवलंबून असलेले आई-वडील यांच्या गंभीर आजाराच्या कारणास्तव महसूल विभाग बदलण्यासाठी विनंती अर्ज करण्याची मुभा होती. यामध्ये सुधारणा करून आता महिला अधिकाऱ्यांनाही आपल्या सासू-सासऱ्याच्या सुश्रुषेसाठीही महसुली विभाग बदलून मिळण्याची विनंती करण्याची मुभा देण्यात आली आहे.

यासोबतच महाराष्ट्र शासकीय गट "अ' व गट "ब' (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी आपापसात महसुली विभाग बदलून देण्याची विनंती केल्यास बदली करण्याच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली.

खेडला वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास व या न्यायालयाकरिता आवश्‍यक पदे निर्माण करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उच्चस्तर सचिव समितीच्या सहमतीने नवीन पदे निर्माण होणार आहेत.

'सेंटर फॉर परफेक्‍ट हेल्थ'ला अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा
पुणे जिल्ह्यातील वहाणगाव (ता. मावळ) येथील सेंटर फॉर परफेक्‍ट हेल्थ या एकात्मिक प्रकल्पास प्रायोगिक तत्त्वावर राज्यात प्रथमच 500 कोटी रुपये गुंतवणुकीच्या निकषावर अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच उद्योग, पर्यटन व वैद्यकीय शिक्षण धोरणानुसार या प्रकल्पाला लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

महर्षि वेदोद्धारक फाउंडेशन आणि महर्षि वेदिक हेल्थ प्रा. लि. यांच्याद्वारे सेंटर फॉर परफेक्‍ट हेल्थ या विशेष घटक यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे. या एकात्मिक प्रकल्पाद्वारे वहाणगाव येथे एकूण 264 एकर जागेवर एक हजार कोटी रुपये गुंतवणूक करून सुमारे पाच हजार व्यक्तींसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामध्ये आयुर्वेदिक औषध निर्मिती, ध्यान धारणा, वेलनेस सेंटर, योगाभ्यास, आयुर्वेदिक महाविद्यालयाची उभारणी प्रस्तावित आहे. राज्यात प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर पर्यटन, उद्योग क्षेत्रातील रोजगार निर्मिती आणि परिसर विकास यांचा मेळ साधणाऱ्या या नावीन्यपूर्ण उपक्रमास शासनाने प्रोत्साहन दिले आहे. अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा देण्यासाठी पर्यटन धोरण आणि उद्योग धोरण या दोन्ही धोरणांमध्ये नमूद निकषांपैकी प्रत्येकी एक निकष हा प्रकल्प पूर्ण करीत आहे. यामुळे 500 कोटी रुपये गुंतवणुकीच्या निकषावर त्यास अतिविशाल प्रकल्पाचा दर्जा मान्य करण्यात आला आहे. या प्रकल्पास 500 कोटींच्या गुंतवणुकीनंतर उद्योग, पर्यटन व वैद्यकीय शिक्षण धोरणानुसार लाभ मिळू शकतील.

भाषा भवनाच्या उभारणीस गती
राज्य सरकारतर्फे मुंबईत उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाला आता गती देण्यात आली असून, दक्षिण मुंबई परिसरातील महत्त्वाच्या भागात या भवनाच्या प्रशासकीय कार्यालयांची उभारणी करण्याबाबत मराठी भाषा विभागाच्या मंत्री स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार आज बैठकीत देण्यात आले. कार्यक्रमांसह इतर अनुषंगिक वापरासाठी नवी मुंबईतील ऐरोली येथे उपकेंद्र उभारण्यासही आज मंजुरी देण्यात आली.

यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दक्षिण मुंबईतील धोबी तलाव परिसरात रंगभवन येथे मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्राची (मराठी भाषा भवन) उभारणी करण्यात येणार होती. मात्र, रंगभवनाची वास्तू हेरिटेज यादीत समाविष्ट असल्याने या जागेवर भाषा भवन उभारण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, फोर्ट किंवा वांद्रे-कुर्ला वसाहत परिसरात भाषा भवनाची वास्तू उभारण्याबाबत मराठी भाषा विभागाच्या स्तरावर निर्णय घेण्याचे आज ठरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com