शहरातल्या "राष्ट्रवादी'ला सावरता येईना पडझड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

मुंबई - ग्रामीण भागातल्या बालेकिल्ल्यांचे बुरूज ढासाळत असताना शहरी भागात सुरू असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेसची पडझड पाहून पक्षाचे नेते हैराण झाले आहेत. पक्षस्थापनेनंतर नंबर एकचा असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शहरातला आलेख सतत उतरत असून, आता तर अनेक महापालिकांमध्ये पक्षाचे संख्याबळ शून्यावर आल्याने ही पडझड रोखण्यासाठी पक्षाला कठोर निर्णय घ्यावे लागतील अशी चर्चा पदाधिकाऱ्यांमधे सुरू आहे. 

पनवेल, भिवंडी, मालेगाव, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली आणि आता नांदेड या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ शून्यावर आले आहे. 2014 च्या अगोदर या महापालिकांमध्ये पक्षाची ताकद होती. मात्र त्यानंतर सुरू झालेली वाताहत पक्षाला रोखताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. 

भिवंडी, मालेगाव, मीरा-भाईंदर आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षसंघटन मजबूत होते. मात्र स्थानिक प्रभारी नेतृत्वाने 2014 नंतर या महानगरातील संघटन बांधणीला फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचा दावा करण्यात येत आहे. शहरी मध्यमवर्गात राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिमा सुधारण्यासाठी कोणत्याही प्रकारचा ठोस अजेंडाच पक्षाकडे नसल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे मानले जात आहे. 

मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नऊ नगरसेवक आहेत. मात्र यापैकी सहा नगरसेवक हे अल्पसंख्याक समाजाचे आहेत, तर ठाण्यात 36 नगरसेवक आहेत. मुंबईत अल्पसंख्याक समाजाचे नेते व पक्षाचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांचे नेतृत्व असल्याने या समाजात राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा असल्याचे दिसते. ठाणे शहरात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे पक्षाची ताकद टिकून आहे. मात्र इतर महानगरपालिका क्षेत्रांत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सक्षम नेतृत्वाचा प्रश्‍न व जबाबदारी दिलेल्या प्रभारींचे दुर्लक्ष यामुळे पक्षाची वाताहत सुरू असल्याचे चित्र आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news NCP