विस्मृतीतील पोस्ट कार्डांना चित्ररूपी संजीवनी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

मुंबई - ई-मेल आणि व्हॉट्‌सॲपच्या जमान्यात पोस्ट कार्ड विस्मृतीत गेले आहे. काहींनी अजूनही त्या काळातील आठवणी मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेल्या आहेत. त्या आठवणींना पोस्ट कार्डवर रेखाटून देशभरातील १५६ चित्रकारांनी अनोख्या पद्धतीने वाट करून दिली आहे. काळाघोडा आर्टिस्ट सेंटरमध्ये अशा कलाकृतींचे ‘पोस्टएज’ प्रदर्शन भरवण्यात आले आहे. १६ सप्टेंबरपर्यंत ते सुरू राहणार आहे. मुख्य टपाल कार्यालयाचे वरिष्ठ उपनिर्देशक एच. सी. पटेल यांनी प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले. तेव्हा त्यांनी जीपीओतही असे प्रदर्शन भरवण्याची घोषणा केली.

‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ गोष्टीपासून सद्यस्थितीवर भाष्य करणाऱ्या कलाकृती पोस्ट कार्डांवर रेखाटण्यात आल्या आहेत. कॉपी पेस्टच्या जमान्यात पत्र लिहिणे केव्हाच मागे पडले आहे. पोस्ट कार्डवरील शब्दांतील भावनांचा ओलावा संपून त्यांची जागा आता स्माईलींनी घेतली आहे. ‘पोस्टएज’ प्रदर्शनाद्वारे पोस्ट कार्डांच्या आठवणी कलाकृतींद्वारे जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोस्ट कार्डवर बाबांना लिहिलेली कविता व त्यामागे बाबांचे चित्र, लहान मुलांना पाठवलेली चित्ररूपी गोष्ट, लग्नपत्रिका अादी विविध प्रयोग चित्रकारांनी केले आहेत. केवळ आठवणींत न रमता आता पोस्ट कार्ड वापरात असती तर समाजातील बऱ्या-वाईट घटनांचे पडसाद त्यावर कसे उमटले असते, याचे बोलके चित्रण त्यात करण्यात आले आहे. गाईवरून सुरू असलेले राजकारण, प्रायव्हसीवरून सुरू असलेले न्यायालयीन प्रकरण किंवा गांधी-मोदी चित्रांचा संगम असे ताज्या स्थितीवरही मार्मिक टिप्पणी करण्यात आली आहे. बेंगळूरु, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, हैदराबाद अादी विविध ठिकाणांहून चित्रकारांनी आपल्या भन्नाट कल्पना पोस्ट कार्डावरील चित्रांतून साकारल्या आहेत.

सध्यस्थितीत पोस्ट कार्डवरील चित्ररूपी आविष्कार हा वेगळा प्रयोग आहे. हे प्रदर्शन गतकाळात घेऊन जाणारे आहे. छोट्याशा पोस्ट कार्डवर साकारलेली चित्रे वेगळा अनुभव देतात. हे प्रदर्शन आता केवळ मुंबईत नव्हे; तर सुरत, चेन्नई, बेंगळूरु येथेही भरवण्यात येणार आहे. 
- नीलेश किंकले  (सेक्रेटरी, आर्टिस्ट सेंटर)

Web Title: mumbai news post card Postage exhibition