टपाल कार्यालयात आधार अद्ययावत सेवा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

मुंबई - देशभरात दिवसाला दीड लाख नागरिकांकडून मोबाईल क्रमांकाची माहिती अद्ययावत करण्यात येते. आता टपाल कार्यालयाच्या माध्यमातूनही आधार कार्डातील माहिती अद्ययावत करण्याची सुविधा राज्यभरात सुरू झाली आहे. नुकतीच मुंबई "जीपीओ'च्या कार्यालयातून त्याची सुरवात झाली. मुंबईसह राज्यातील शंभर ठिकाणी ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरीश अग्रवाल यांनी दिली. 

महाराष्ट्रात टपाल विभागाची एकूण दोन हजार कार्यालये आहेत. या कार्यालयांत "आधार'मधील माहिती अद्ययावत करण्याची सुविधा देण्याचे उद्दिष्ट जुलैअखेरीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे अग्रवाल म्हणाले. लवकरच आधार कार्डच्या नोंदणीची सुविधाही टपाल कार्यालयात देण्यात येईल, असे ते म्हणाले. आधार कार्ड नोंदणीसाठी "बायोमेट्रिक'च्या उपकरणाची सुविधा सर्वत्र द्यावी लागेल. म्हणूनच आधार नोंदणी केंद्राची उभारणी करण्यासाठी आणखी वेळ लागेल, असे ते म्हणाले. 

महाराष्ट्रात 95 टक्के आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित नागरिकांसाठी आधार केंद्राची सुविधा कायम असेल. बहुतांश नागरिकांकडून आता मोबाईल क्रमांक, पत्ता, नाव आदींसारख्या गोष्टींसाठी आधार अद्ययावतची सुविधा वापरण्यात येत आहे. त्यामुळेच टपाल कार्यालयातून ती देण्यात आल्याची माहिती आधार मुंबई केंद्राचे उपमहासंचालक डॉ. संजय चहांदे यांनी दिली. 

ओटीपीद्वारे मिळणार सेवा 
आधार अद्ययावत सुविधेसाठी टपाल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. "आधार'शी संबंधित अनेक सेवांचा लाभ "ओटीपी'च्या माध्यमातून घेण्यासाठी नागरिकांनी आता मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

Web Title: mumbai news post office aadhar card