प्रश्‍नपत्रिका तयार करण्याच्या प्रशिक्षणामुळे शिक्षक संतप्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

नव्या अभ्यासक्रमातील नव्या संकल्पना समजण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. उत्तरपत्रिका संचाबाबतची माहिती दोन महिन्यांपूर्वीच संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली होती. पितृपंधरवड्यानंतरच प्रशिक्षण घेतले जावे, अशी काही शिक्षक संघटनांची मागणी होती. 
- डॉ. सुनील मगर, संचालक, बालभारती 

मुंबई - सत्र परीक्षा सुरू व्हायला काही दिवस शिल्लक असताना नववीच्या प्रश्‍नपत्रिका तयार करण्याचे प्रशिक्षण सुरू झाल्याने शिक्षक संतापले आहेत. बुधवारी (ता. 20) हे प्रशिक्षण सुरू झाले आहे. हा शिक्षण विभागाचा गोंधळ आहे, असा आरोप टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंटच्या राजेश पांड्या यांनी केला. 

शाळांमध्ये 27 सप्टेंबरपासून प्रथम सत्राची परीक्षा सुरू होणार आहे. यंदा नववीचा अभ्यासक्रम बदलला. जूनच्या सुरवातीला नववीची पाठ्यपुस्तके न मिळाल्याने शिक्षकांमध्ये गोंधळ होता. बदललेले पुस्तक मेच्या पूर्वीच मिळाले असते, तर उन्हाळी सुटीत ही पुस्तके वाचता आली असती, असे शिक्षकांचे म्हणणे होते. बदललेल्या अभ्यासक्रमाची पहिली सत्र परीक्षा, त्याच्या प्रश्‍नपत्रिका कशा असाव्यात याबाबत शिक्षण विभागाकडून कोणतीच स्पष्टता नव्हती. प्रथम सत्र परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी आणि प्रश्‍नपत्रिकेसाठी शिक्षण विभागाने बुधवारपासून सुरू केलेले प्रशिक्षण म्हणजे आयत्या वेळी सुचलेले शहाणपण आहे, अशा शब्दांत पांड्या यांनी टीका केली. 

Web Title: mumbai news questin paper teacher