शेतकऱ्यांच्या लढ्यासह संघर्षयात्रेचा विजय - विखे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

मुंबई - विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्षयात्रेमुळे शेतकऱ्यांचे मनोबल वाढले व त्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी मोठा लढा उभारला. कर्जमाफीसंदर्भात सरकारने घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांच्या लढ्याचा व संघर्षयात्रेचा विजय आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. मात्र,  सरकारने या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी न केल्यास मोठी किंमत मोजावी लागेल, असेही त्यांनी बजावले आहे. 

शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले, की राज्यभरातील शेतकरी संघटित झाल्यामुळे सरकारवर दबाव निर्माण होऊन त्यांना शेतकरी कर्जमाफीला तत्त्वतः मान्यता देणे भाग पडले. हे सरकार शेतकरी कर्जमाफीच्या मागणीला दाद द्यायला तयार नसल्याने कॉंग्रेस व इतर विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन ठप्प केले होते. त्यानंतर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती करून राज्यातील वातावरण ढवळून काढले. संघर्ष यात्रेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच सरकार "बॅकफूट'वर आले आणि कर्जमाफीसंदर्भात त्यांना आपला दृष्टिकोन बदलणे भाग पडले. 

सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी जेणेकरून त्यासाठी आर्थिक तरतूद करणे शक्‍य होईल, अशी मागणी आम्ही सातत्याने लावून धरली होती. त्याच वेळी ही घोषणा झाली असती तर खरिपाच्या प्रारंभीच कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देता आला असता, असे त्यांनी सांगितले. केवळ घोषणा करून शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, तर त्यासाठी कर्जमाफीच्या प्रभावी अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा लागेल. कर्जमाफी प्रत्यक्षात मिळत नाही तोवर कॉंग्रेस आपला संघर्ष व सरकारवरील दबाव कायम ठेवेल, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे. 

Web Title: mumbai news radha krishna vikhe patil