सचिनच्या मुलीच्या नावाने बनावट ट्विटर अकाउंट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

मुंबई - क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्या नावाने बनावट ट्विटर अकाउंट तयार केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी मंगळवारी (ता. 6) रात्री अंधेरीतील नितीन आत्माराम सिसोदे (39) या सॉफ्टवेअर अभियंत्याला अटक केली.

मुंबई - क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्या नावाने बनावट ट्विटर अकाउंट तयार केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी मंगळवारी (ता. 6) रात्री अंधेरीतील नितीन आत्माराम सिसोदे (39) या सॉफ्टवेअर अभियंत्याला अटक केली.

सिसोदे याने या अकाउंटवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्‌विट केले होते. त्याने आणखी काही सेलिब्रेटींच्या नावानेही बनावट ट्‌विटर अकाउंट सुरू केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सेलिब्रिटींच्या वादग्रस्त ट्विटमुळे संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढते. त्या माध्यमातून अधिक पैसे कमावता येऊ शकतात, हे समजल्याने नितीनने हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गेल्या वर्षी 9 ऑक्‍टोबरला साराच्या नावाने असलेल्या ट्विटर खात्यावरून पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे ट्‌विट झाल्यामुळे खळबळ उडाली होती. लंडनमध्ये शिकणाऱ्या साराच्या नावाशी साधर्म्य असलेले @SaraSachin_rt या अकाउंटवर तिच्या छायाचित्राचा वापरही करण्यात आला होता. त्यानंतर सचिन तेंडुलकरने स्वतःच्या अधिकृत ट्‌विटर अकाउंटरून हे अकाउंट साराचे नसल्याचा खुलासा केला होता. त्याने खासगी सचिवामार्फत पोलिसांकडे तक्रारही केली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते.

ट्‌विटर खाते परदेशातून हाताळले?
साराच्या नावाने बनवण्यात आलेल्या ट्‌विटर अकाउंटचे "लॉग इन' व "लॉग आउट' हे परदेशातील आयपी ऍड्रेसवरून झाल्याची माहिती पोलिसांना ट्‌विटरकडून मिळाली. त्यामुळे हे खाते परदेशातून हाताळण्यात आले की, त्यासाठी प्रॉक्‍झी सर्व्हरचा वापर करण्यात आला, याबाबत सायबर पोलिस तपास करत आहेत. सिसोदेने कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला का?, याबाबतही पोलिस तपास करत आहेत.

Web Title: mumbai news sara tendulkar bogus twitter account crime