तलावाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपमध्ये जुंपली 

तलावाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपमध्ये जुंपली 

मुंबई -मालाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलावाच्या सुशोभीकरणावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली आहे. या तलावाच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावात त्रुटी असल्याचा दावा करत तो रद्द करण्यासाठी भाजपच्या नगरसेवकाने आज महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले; तर हा प्रस्ताव योग्य असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाने मालाड पूर्व येथील डॉ. आंबेडकर तलाव जुलैमध्ये पालिकेला हस्तांतरित केला. चार वर्षांपूर्वी चार कोटी खर्च करून या तलावाचे म्हाडामार्फत सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र, दूषित पाण्यामुळे तलावातील मासे मरत असल्याने ऑक्‍सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही तुरळक दुरुस्ती करण्यात येणार आहेत. मात्र, संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने सर्वेक्षण करावे आणि पुन्हा निविदा मागवाव्यात, अशी मागणी भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केली होती. त्यानंतरही प्रशासनाने निविदा रद्द न केल्यामुळे त्यांनी आज आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. 

चार वर्षांपूर्वीच या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले होते. त्यानंतरही काही बदल करण्याचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे तो रद्द करण्याची गरज नाही, अशी भूमिका शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी मांडली. 

मिश्रा यांनी आयुक्त अजोय मेहता यांचीही भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनीही त्याला नकार दिला. हा प्रस्ताव स्थायी समितीत मांडण्यात येणार आहे. त्यावर स्थायी समिती निर्णय घेईल, असे आयुक्तांनी मिश्रा यांना सांगितले असल्याचे समजते. 

राजहंस सिंह यांच्या नावाची पाटी हटवणार? 
कॉंग्रेसचे तत्कालीन आमदार राजहंस सिंह यांच्या आमदार निधीतून चार वर्षांपूर्वी तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले होते. त्यांच्या नावाची पाटी तलावावर आहे. राजहंस सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते दिंडोशी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतात. भाजप नगरसेवकाच्या मागणीनुसार या तलावाचे नव्याने सुशोभीकरण झाल्यास सिंह यांच्या नावाची पाटी हटवण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com