एसटी कर्मचाऱ्यांची आज संपाबाबत चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मुंबई - 'एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ उच्चस्तरीय समितीने दिलेला अहवाल म्हणजे कर्मचाऱ्यांची एकप्रकारे क्रूरथट्टाच केली आहे. त्यामुळे आम्हाला हा अहवाल मान्य नाही,' असे म्हणत सर्व एसटी कर्मचारी संघटना पुन्हा एकत्र आल्या आहेत. शुक्रवारी (ता.19) होणाऱ्या बैठकीत संपाची रणनिती ठरणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यावर दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने वेतनवाढ कशी देता येईल, याबाबत एसटी कामगार संघटनांशी चर्चा करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आमच्याशी कोणत्याही प्रकारे चर्चा न करता राज्य शासनाच्या पाच सचिवांच्या उच्चस्तरीय समितीने हा अहवाल सादर केला. एसटी कर्मचारी संघटनांनी सातवा वेतन आयोग लागू करा ही प्रमुख मागणी केली होती, मात्र अद्याप त्यावर सरकारने कोणतीच अंमलबजावणी केली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शुक्रवार 19 जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल, त्यानंतर संपाची कायदेशीर घोषणा केली जाईल, असे संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
Web Title: mumbai news st employee discussion on strike