'मातोश्री' भेटीची प्रथा मोडून उद्धव ठाकरे ममतांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

मुंबई - देशातल्या बड्या-बड्या नेत्यांनी "मातोश्री'वर पायधूळ झाडली आहे; मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रथमच "मातोश्री'बाहेर पडून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ममता बॅनर्जी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्याबरोबरच त्या उद्योगपतींच्या भेटीगाठी घेत आहेत. उद्धव आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज त्यांची भेट घेतली; मात्र ही भेट ठाकरे कुटुंबीयांच्या "मातोश्री' निवासस्थानी झाली नाही, तर ममतांचा मुक्काम असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये दीड- दोन तास चर्चा झाली. चर्चेचा तपशील मिळू शकत नसला तरी एखाद्या राजकीय व्यक्तीसाठी ठाकरे कुटुंबीयांनी "मातोश्री' सोडल्यामुळे अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी "मातोश्री'वर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही अलीकडेच राष्ट्रपतिपदाचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी "मातोश्री'वर जाऊन उद्धव यांची भेट घेतली होती.

ममता बॅनर्जी या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट्टर विरोधक आहेत. मोदी यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला त्यांनी कडाडून विरोध केला आहे, तर केंद्र आणि राज्याच्या सत्तेत राहूनही शिवसेनेने भाजपच्या अनेक निर्णयांना विरोध केला आहे. उद्धव यांनी राष्ट्रीय पक्षांविरोधात सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका मांडली आहे, त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Web Title: mumbai news uddhav thackeray meet to mamta banerjee