गांधींवर टीका केली अन् योगेश सोमणांना पाठविले सक्तीच्या रजेवर

वृत्तसंस्था
बुधवार, 15 जानेवारी 2020

योगेश सोमण यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात राहुल गांधी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली होती. या टीकेमुळेच त्यांच्यावर ही कारवाई केली गेली. 

अभिनेते व मुंबई विद्यापीठाचे थिएटर ऑफ आर्टसचे संचालक योगेश सोमण यांना विद्यापीठाने अचानक सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे त्यांना या सक्तीच्या रजेला तोंड द्यावे लागत आहे. योगेश सोमण यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात राहुल गांधी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली होती. या टीकेमुळेच त्यांच्यावर ही कारवाई केली गेली. 

माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी!; मरण पत्करेन पण...​

योगेश सोमण यांनी 14 डिसेंबरला त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. राहुल गांधीनी वीर सावरकरांवर टीका केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून हा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला होता. या व्हिडिओत त्यांनी राहुल गांधी व इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली होती. या व्हिडिओच्या निषेधार्थ सोमण यांना लगेच निलंबित करावे अशी मागणी एनएसयूआय विद्यार्थी संघटनेने केली होती. पण यानंतर लगेच कारवाई न करता सोमवारी (ता. 13) त्यांच्यावर विद्यापीठाने कारवाई केली व सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.

'होय मी सावरकर' पुण्यात झळकले फलक; राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध

सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी गैरसोयींविरोधात आंदोलन केले. अनुभव नसलेले शिक्षक, न शिकवताच अभ्यासक्रम पूर्ण करणे, नाट्यशास्त्र विभागातील गैरसोयी अशा तक्रारी या विद्यार्थ्यांनी केल्या. यानंतर सोमवारी रात्री उशिरा योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. याच आंदोलनात व्हिडिओचा मुद्दा उभा करत एनएसयूआय आणि छात्रभारती या संघटनांनी सोमण यांच्या निलंबनाचीही मागणी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुबंई विद्यापीठाने या सर्व प्रकरणासाठी सत्यशोधक समिती नेमली आहे. या प्रकरणाची पुढील कारवाई होईपर्यंत सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. चार आठवड्यात या प्रकरणाचा निकाल लागणे आवश्यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai University takes action on Yogesh Soman for criticism on Gandhi family