गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी ‘रॉ’मार्फत करावी : सुप्रिया सुळे

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी ‘रॉ’मार्फत करावी : सुप्रिया सुळे

भोर - मतदान हे यंत्रापेक्षा (ईव्हीएम) मतपत्रिकेवर घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेससह सोळा पक्षांनी केलेली आहे. याशिवाय मतदान यंत्रातील गैरव्यवहाराची सीबीआय चौकशीची मागणी केली होती; परंतु सीबीआयवरील आमचा विश्वास कमी झाला आहे. गोपीनाथ मुंडे यांची हत्या मतदान यंत्रातील घोटाळ्यातून झाल्याची बातमी परदेशातून आली आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची चौकशी आंतरराष्ट्रीय रॉ (रिसर्च अँड अॅनालिसिस विंग) संस्थेमार्फत करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

किकवी (ता. भोर) परिसरातील एक कोटी २३ लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या उद्‌घाटन व भूमिपूजनप्रसंगी सुळे बोलत होत्या. एक चहावाला सुशिक्षित होऊन देशाचा पंतप्रधान होतो, हा काँग्रेसने मागील ६० वर्षांत केलेल्या कामाचाच पुरावा आहे. काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या विकासकामांमुळे ग्रामीण भागात शिक्षण, रस्ते, वीज व इतर गोष्टींचा विकास झाल्यामुळेच मोदी यांना पंतप्रधान होता आले, अशा शब्दांत गेल्या साठ वर्षांत काय केले, या प्रश्नावर सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले. 

राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाठे अध्यक्षस्थानी होते. या वेळी राष्ट्रवादीचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रदीप खंदारे, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, जिल्हा बॅंकेचे संचालक भालचंद्र जगताप, माजी सभापती सुनीता बाठे, जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे, महिलाध्यक्षा विद्या यादव, शहराध्यक्ष नितीन धारणे, बाळकृष्ण दळवी, शिवाजीराव कोंडे, नारायण आहिरे, मनोज खोपडे, केतन चव्हाण, स्वप्नील कोंडे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रकांत बाठे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे किकवीत ७५ लाख, पाचलिंगेत साडेदहा लाख, मोरवाडीत साडेपाच लाख, राऊतवाडीत २० लाख आणि वागजवाडीत ३२ लाखांची विकासकामे झाल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.

भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या एकाही गोष्टीची पूर्तता केलेली नाही. ना प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा झाले, ना दोन कोटी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, ना देशाबाहेरील काळा पैसा आणला आणि ना अच्छे दिन आले. उलट देशावर सुमारे ५४ लाख कोटी रुपयांचे कर्ज केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही असंवेदनशील आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकारच राज्य व देश चालविण्यासाठी योग्य आहे.
- सुप्रिया सुळे, खासदार, बारामती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com