महापालिका, जिल्हा परिषदांसाठी मतदानाला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 3 हजार 210 जागांसाठी 17 हजार 331 उमेदवारांमध्ये लढत होत आहे. त्यासाठी तीन कोटी 77 लाख 60 हजार 812 मतदारांकरिता 43 हजार 160 मतदान केंद्रांची, तसेच 68 हजार 943 कंट्रोल युनिट व 1 लाख 22 हजार 431 बॅलेट युनिटसह यंत्रांची व्यवस्था करण्यात आली.

मुंबई - मिनी विधानसभेची निवडणूक असलेल्या राज्यातील 10 महापालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 118 पंचायत समित्यांसाठी आज (मंगळवार) मतदान होत असून, सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 3 हजार 210 जागांसाठी 17 हजार 331 उमेदवारांमध्ये लढत होत आहे. त्यासाठी तीन कोटी 77 लाख 60 हजार 812 मतदारांकरिता 43 हजार 160 मतदान केंद्रांची, तसेच 68 हजार 943 कंट्रोल युनिट व 1 लाख 22 हजार 431 बॅलेट युनिटसह यंत्रांची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर 2 लाख 73 हजार 859 कर्मचाऱ्यांसह आवश्‍यक तेवढा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, अशोक चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पायाला भिंगरी लावून राज्यभर प्रचार सभा घेतल्या. या सभांची संख्या 300 च्या आसपास असून, नेत्यांच्या दिमतीला संबंधित राजकीय पक्षांचे अन्य नेते मैदानात उतरले होते.

स्थानिक निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच नेत्यांनी एकमेकांवर शेलक्‍या शब्दांत टीका केल्याने ही दंगल अनुभवणारे मतदार उद्या राज्याच्या पुढील राजकारणाची दिशा ठरवणार आहेत.

वर्धा जिल्हा परिषदेच्या 2 आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या 6 जागांबरोबरच त्याअंतर्गतच्या पंचायत समितीच्या 16 जागांसाठीदेखील उद्या मतदान होत आहे. न्यायालयीन प्रकरणांमुळे या ठिकाणी पहिल्या टप्प्यात मतदान घेण्यात आले नव्हते. सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल; मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. या सर्व ठिकाणी 23 फेब्रुवारी 2017 रोजी मतमोजणी होईल.

महापालिकानिहाय (कंसात जागा) उमेदवार :
बृहन्मुंबई (227)- 2,275, ठाणे (131)- 805, उल्हासनगर (78)- 479, पुणे (162)- 1,090, पिंपरी-चिंचवड (128)- 774, सोलापूर (102)- 623, नाशिक (122)- 821 अकोला (80)- 579, अमरावती (87)- 627 आणि नागपूर (151)- 1,135. एकूण (1,268)- 9,208.

जिल्हा परिषद व पंचायत समितीनिहाय (कंसात एकूण जागा) - 
रायगड (59)- 187, रत्नागिरी (55)- 226, सिंधुदुर्ग (50)- 170, नाशिक (73)- 338, पुणे (75)- 374, सातारा (64)- 285, सांगली (60)- 229, सोलापूर (68)- 278, कोल्हापूर (67)- 322, अमरावती (59)- 417, वर्धा (2)- 8, यवतमाळ (6)- 34 आणि गडचिरोली (16)- 88. एकूण (654)- 2,956. या जिल्हा परिषदाअंतर्गतच्या 118 पंचायत समित्या (एकूण जागा 1288)- 5,167.

दहा महापालिका
एकूण जागा- 1,268
उमेदवार- 9,208
एकूण मतदार- 1,95,37,196
मतदान केंद्रे- 21,001

जिल्हा परिषद, पंचायत समित्या (दुसरा टप्पा)
जि. प. एकूण जागा- 654
जि. प. उमेदवार- 2,956
पं. स. एकूण जागा- 1,288
पं. स. उमेदवार- 5,167
एकूण मतदार- 1,82,23,616

कायदा व सुव्यवस्थेबाबत कार्यवाही
प्रतिबंधात्मक कारवाई-54,025
नाकाबंदी- 9,700
अवैध शस्त्र जप्त- 211
रोकड जप्त- 75,66,980 (प्रकरणे 17)
अवैध दारू- 6,81,556 लिटर (प्रकरणे 10,898)
आचारसंहिता भंग प्रकरणे- 338
मालमत्ता विद्रुपीकरण- 77
तडीपार- 371

एकूण व्याप्ती
एकूण जागा- 3,210
उमेदवार- 17,331
मतदार- 3,77,60,812
मतदान केंद्रे- 43,160

Web Title: municipal corporation, Zp election in maharashtra