पहिल्या क्रमांकाच्या श्रेयासाठी भाजप आणि राष्ट्रवादीत 'शीतयुद्ध'

कुणाल जाधव
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

निकालांच्या आकडेवारीचे आपापल्या परीने "अन्वयार्थ' लावत भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी आपली टिमकी वाजविली आहे. आता या दोघांत नेमके "नंबर वन' कोण हा फैसला तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

मुंबई - राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर श्रेयवादाची नवी लढाई सुरु झाली आहे. या निवडणुकांमध्ये आपलाच पक्ष "नंबर वन' असल्याचा दावा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केला  आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या दोघांनीही आपापली पाठ थोपटत या श्रेयवादाच्या लढाईत उडी घेतली आहे.

राज्यातील 14 नगरपालिकांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेण्यात आलेल्या निवडणुकांचा निकाल नुकताच जाहिर झाला. एकूण 324 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपचे 5 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. यात पुण्यातली 3 तर लातूरमधील 2 नगराध्यक्ष पदांचा समावेश आहे. त्यामुळे या निकालात आपणच बाजी मारली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. 

एकूण 324 जागांपैकी राष्ट्रवादीच्या अधिकृत चिन्हावर 93 उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी पुरस्कृत 12 उमेदवारांनाही यश संपादन करता आले आहे. त्यामुळे विययी उमेदवारांचा आकडा शंभराच्या वर गेल्याचे सांगत आपणच पहिला क्रमांक पटाकवल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली आहे. बारामतीत नगराध्यक्ष पदासह एकूण 35 जागांवर विजय मिळवित राष्ट्रवादीने आपला गड राखला आहे. 

निकालांच्या आकडेवारीचे आपापल्या परीने "अन्वयार्थ' लावत भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी आपली टिमकी वाजविली आहे. आता या दोघांत नेमके "नंबर वन' कोण हा फैसला तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

शंभरहून अधिक उमेदवार निवडून आल्याने राष्ट्रवादी नंबर वन ठरला आहे. पहिल्या टप्प्याच्या मानाने हे यश वाखाणण्याजोगे आहे.
- सुनिल तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

नगरपालिका निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातही पहिल्या क्रमांकाचे स्थान भाजपने कायम ठेवले आहे. जनतेने दाखविलेल्या या विश्‍वासाच्या बळावर पुढील टप्प्यांमध्येही अशीच आघाडी कायम राहील.
- रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

Web Title: municipal council election results