राज्यभरात निकालांचे फटाके आज

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

लोकसभा आणि विधानसभेनंतर ग्रामीण भागात पहिल्यांदाच मतदान होत असल्याने आजही भाजपची लाट आहे की नाही, याचे मूल्यमापन करणारी ही निवडणूक ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभारावर शिक्‍कामोर्तब करणारी ही निवडणूक असल्याचे मानले जाते.

मुंबई - राज्यातील दहा महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांचे निकाल आज (ता.23) जाहीर होणार आहेत. विधानसभेची नांदी दडलेल्या या "मिनी विधानसभे'च्या आखाड्यात कोण बाजी मारणार याचे औत्सुक्‍य असून, राज्यभरात "आव्वाज कुणाचा' हेही उद्याच समजेल. ग्रामीण व मोठ्या शहरांतील मतदारांचा कौल आजही भाजपकडे कायम आहे काय, याची परीक्षा घेणारे निकाल म्हणून याकडे पाहिले जात आहे.

राज्यभरात आज सकाळी दहा वाजल्यापासून 283 पंचायत समिती केंद्रांवर, तर 113 महापालिका केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. मुंबईत 23 मतदानकेंद्रांवर मतमोजणी होणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत राज्यातल्या निकालांचे बहुतांश चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज आहे.

अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जनता पक्षाची खरी कसोटी लागणार आहे, तर मुंबई, ठाणे, नाशिक व उल्हासनगर महानगरपालिकांमध्ये शिवसेनेच्या अस्मितेची लढाई आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांत राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर भाजपचे तगडे आव्हान आहे. नागपूर, अमरावती व अकोला महापालिकांत भाजपला संधी असल्याचे दावे केले जात आहेत. शहरी मतदारांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने मतदान केल्याने वाढलेले मतदान नेमके कोणाच्या पारड्यात जाणार, हाही चर्चेचा विषय आहे.

लोकसभा आणि विधानसभेनंतर ग्रामीण भागात पहिल्यांदाच मतदान होत असल्याने आजही भाजपची लाट आहे की नाही, याचे मूल्यमापन करणारी ही निवडणूक ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभारावर शिक्‍कामोर्तब करणारी ही निवडणूक असल्याचे मानले जाते. नोटाबंदीच्या सावटाखाली होरपळलेल्या शेतकऱ्यांचा कौल काय येतो, हे पाहणेही औत्सुक्‍याचे आहे.

मतमोजणीचा पसारा
10 महापालिका
25 जिल्हा परिषदा
283 पंचायत समित्या

Web Title: municipal, zp & panchyat committee result