Solapur Murder: उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरही सोलापुरात खून! बाळासाहेबाने १ वार हुकविला, पण २ वार छातीवर बसले अन्‌...

Balasheb sarvade Murder: मोबाईल बंद करून पुण्याकडे निघालेले चौघे अर्ध्यातून कोल्हापूरच्या दिशेने वळले, पण...
solapur city murder

solapur city murder

sakal

Updated on

सोलापूर : बाळासाहेब सरवदे खून प्रकरणातील चार संशयित आरोपींना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे दीडच्या सुमारास सातारा-पुणे महामार्गावरील तासवडे टोल नाक्यावर पकडले. त्यांच्याकडून विचारपूस केल्यावर शहरात लपून बसलेल्या सहा जणांना जेलरोड पोलिसांनी पकडले. जखमी राहुल सरवदेसह पाचजण यापूर्वीच पकडले होते. ११ जणांना घेऊन जेलरोड पोलिस रविवारी (ता. ४) सायंकाळी पाच वाजता न्यायालयात दाखल झाले. न्यायाधीश आल्यानंतर साडेसहा वाजता सुनावणी पार पडली. न्यायालयाने सर्व संशयितांना ८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली.

प्रभाग ‘दोन-क’मधून भाजपने शालन शिंदे यांना पुन्हा उमेदवारी दिली. पण, रेखा दादासाहेब सरवदे यांनाही भाजपकडून उमेदवारीची आशा होती. शालन शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर रेखा सरवदे यांनी सर्वांचा मान राखून उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर झालेल्या भांडणातून बाळासाहेब सरवदेंचा खून झाला. या गुन्ह्यात मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

घटनास्थळावरून हत्यारे, रक्ताचे नमुने, बांगड्या असे साहित्य पोलिसांनी जप्त केले असून उद्या (सोमवारी) पुण्याच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने माजी नगरसेवकेचा पती शंकर शिंदेसह चौघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर उर्वरित सहा संशयित आरोपींना जेलरोड पोलिसांनी शहरातूनच अटक केली.

रविवारी सुट्टी असताना देखील ११ जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुट्टीमुळे न्याायाधीशांना यायला विलंब झाला, तोपर्यंत संशयित आरोपी न्यायालयात थांबून होते. न्यायाधीशांनी संशयितांना पोलिस कोठडी ठोठावली. यात सरकारतर्फे ॲड. ज्योती वाघमारे यांनी तर संशयितांतर्फे ॲड. राहुल रूपनर यांनी बाजू मांडली. यावेळी पोलिस निरीक्षक भाऊराव बिराजदार उपस्थित होते.

शहर गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना सातारा जिल्ह्यात पकडले

बाळासाहेब सरवदे यांचा खून करून भाजप उमेदवार शालन शिंदेंचे पती शंकर शिंदे चौघांसह रात्रीच पसार झाले होते. शनिवारी (ता. ४) चौघेही चारचाकीतून पुण्याला निघाले, पण अर्ध्या रस्त्यातून त्यांनी कोल्हापूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्यांचे मोबाईल बंद होते. पण, शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलिस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांचे पथक त्या चौघांच्या मागावर होते. सातारा-पुणे महामार्गावरील तळबीड (जि. सातारा) परिसरातील आणेवाडी टोल नाका पास केल्यावर पोलिसांनी तळबीड पोलिसांना संशयितांची माहिती दिली. तेथील पोलिसांनी नाकाबंदी करून तासवडे टोल नाक्याजवळ संशयितांची गाडी पकडली. त्या गाडीत शंकर शिंदे, महेश भोसले, सुनील शिंदे, आलोक शिंदे हे चौघे होते. त्यांना सकाळी साडेसातच्या सुमारास जेलरोड पोलिसांकडे सोपविण्यात आले.

सर्वांचे चेहरे पडलेले, चेहऱ्यावर पश्चातापही

शहर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील उर्वरित ११ संशयित आरोपींना देखील जेरबंद केले आहे. त्यातील विशाल शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, ईश्वर सिद्धेश्वर शिंदे, रोहित राजू सरवदे, महेश शिवाजी भोसले, शंकर बाबू शिंदे, अनिल शंकर शिंदे, शारदा तानाजी शिंदे, आलोक तानाजी शिंदे व विशाल ऊर्फ दादू संजय दोरकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी सर्वांचे चेहरे पडलेले होते.

एक वार चुकविला, पण दोन वार छातीवर बसले अन्‌...

रेखा सरवदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर शालन शिंदे यांच्या कुटुंबातील काहींनी ‘तुमची मस्ती कशी जिरवली, नाद करायचा नाही, पर्मनंट नगरसेवक’ असे मोबाईलवर स्टेट्‌स ठेवले होते. तसेच काहींनी दमदाटीदेखील केली होती. त्याचा जाब विचारायला गेल्यावर टोकाचा वाद झाला. त्या भांडणात शिंदे गटाकडील तरुणांनी बाळासाहेबांवर वार करायला सुरवात केली. त्यावेळी एक वार चुकविताना बाळासाहेबाच्या हातावर बसला, पण दोन वार छातीवर जोरात बसले आणि त्यात बाळासाहेबांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com